पुणे, दि. 12 -दिवाळी विशेष गाड्या चालविण्याची मागणी प्रवशांकडून गेल्या काही दिवसांपासून होत आहे. परंतु, रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे गाड्या सुरू करणे अपेक्षित असताना काही गाड्यांचे डबे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. “एसी थ्री’चे डबे वाढविले असले तरी रेल्वे प्रशासनाने मात्र सर्वसामान्य प्रवाशांऐवजी उच्चवर्गीय प्रवाशांची “सोय’ केल्याचे उघड होत आहे.
शहरातून दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवशांची संख्या मोठी असते. शाळा आणि महाविद्यालयांना मोठी सुट्टी असल्याने नागरिक गावी किंवा फिरायला जाण्याचे नियोजन करतात.
पुणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती आणि शिक्षणाचे माहेर घर असल्याने राज्यातील विविध भागांतून पुणे शहर तसेच जिल्ह्यात शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी आणि विद्यार्थी आलेले आहेत. सुट्टी निमित्त ते गावी जाण्यासाठी निघतात. रेल्वेने सुरक्षित आणि माफक दरात प्रवास होत असल्याने प्रवशांकडून रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले जाते.
रेल्वे प्रशासन उन्हाळी सुट्टी विशेष, छट पुजा विशेष आणि गणेशोत्सव विशेष जादा रेल्वे गाड्यांचे नियोजन करीत असते. तसेच, दिवाळी विशेष गाड्या वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. पण, रेल्वे प्रशासनाने विशेष गाडी वाढविण्याऐवजी काही गाड्याचे “एसी थ्री’ डबे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. हे डबे देखील एसी असल्याने याचा काही ठराविक प्रवाशांनाच फायदा होणार आहे. स्लीपर किंवा दुतीय श्रेणीचे डबे वाढविणे गरजेचे असताना “एसी’ डबे वाढवून रेल्वे प्रशासनाने सामान्य प्रवाशांची थट्टा केली आहे. प्रवाशांची संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे सोडाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
“एसी थ्री’ डबे वाढविण्यात आलेल्या गाड्या…
प्रत्येक गुरूवारी पुणे येथून सुटणारी 22141 पुणे-नागपूर एक्स्प्रेस-दि. 21, 28 ऑक्टोंबर आणि दि. 3 नोव्हेंबर तर प्रत्येक शुक्रवारी नागपूर येथून सुटणाऱ्या 22142 नागपूर-पुणे एक्स्प्रेसला दि. 21, 28 आणि दि. 4 नोव्हेंबरला चार “एसी थ्री’ डबे लावण्यात येणार आहेत तसेच प्रत्येक शनिवारी पुणे स्थानकातून सुटणारी 22139 पुणे-अजनी एक्स्प्रेसला दि. 22, 29 आक्टोंबर आणि दि. 5 नोव्हेंबर तर प्रत्येक रविवारी अजनी येथून सुटणाऱ्या 22140 अजनी-पुणे एक्स्प्रेसला दि. 23, 30 ऑक्टोंबर आणि दि. 6 नोंव्हेंबरला चार “एसी थ्री’ जादा डबे लावण्यात येणार आहेत. प्रत्येक सोमवार, बुधवार आणि शनिवारी पुणे स्थानकातून सुटणाऱ्या 12113 पुणे-नागपूर गरीबरथ एक्स्प्रेसला दि. 22 ऑक्टोंबर ते दि. 14 नोव्हेंबर दरम्यान दोन “एसी थ्री’ डबे वाढविण्यात येणार आहेत तर मंगळवार, शुक्रवार आणि रविवार नागपूर येथून सुटणारी 12114 नागपूर-पुणे गरीबरथ एक्स्प्रेसला दि. 21 ऑक्टोंबर ते दि. 13 नोंव्हेंबर दरम्यान दोन “एसी थ्री’ डबे वाढविण्यात येणार आहेत.