दोडोमा- हातातोंडाची गाठ असणाऱ्या एखाद्या कामगाराने नशिब अचानक उजळले तर अर्थातच तो चर्चेचा विषय ठरतो. ज्याचे खाण्यापिण्याचे हाल आहेत, असा सामान्य कामगार अनपेक्षितपणे कोटयधीश झाला तर खळबळ उडणारच. सध्या टांझानियातील एक खाणकामगार असाच प्रसिध्दीच्या झोतात आला आहे. तो अत्यंत गरीब होता. मात्र त्याला अचानक तब्बल 25 कोटींचा हिरा सापडला असल्यामुळे सगळ्या माध्यमांच्या नजरा त्याच्यावर स्थिरावल्या आहेत. इतकेच नाही, तर त्याचे इतक्या दिवसांपासूनचे एक गुपीतही उघड झाले आहे. ते म्हणजे हा कामगार तब्बल 30 मुलांचा पिता आहे.
सनिनीयू लॅजर असे या कामगाराचे नाव आहे. त्याला त्याचे काम करत असताना दोन रत्न सापडली. त्याच्या मोबदल्यात त्याच्या सरकारने त्याला 7.74 अब्ज टांझानिया शिलींग अर्थात 25.36 कोटी रूपये रकमेचा चेक दिला आहे. डेली मेलने या संदर्भात दिलेल्या बातमीनुसार लॅजरने चार लग्न केली असून त्याला 30 मुले आहेत. आपण आपले काम प्रामाणिकपणे करतो.
मात्र इतके अमूल्य रत्न सापडेल याचा आपण स्वप्नातही विचार केला नव्हता. लॅजरला मिळालेल्या या यशाचा त्याच्या मित्राना तर अभिमान आहेच. मात्र खुद्द सरकारनेही जाहीर कार्यक्रम त्याचा सत्कार केला. त्याला सापडलेले हिरे आता बॅंक ऑफ टांझानियाला देण्यात आले असून त्याचा धनादेशही त्याला प्रदान करण्यात आला आहे.