न्हावरे- शिरूर बाजार समितीच्या सभापतिपदाची निवड सोमवारी (दि.29) होणार आहे. मात्र, निवडीसाठी काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला असताना सभापतीपद शिरुर तालुक्यातून विधानसभेसाठी आंबेगावमध्ये गेलेल्या 39 गावांना देऊन शिरुरमधील उर्वरित 67 गावांचा बळी द्यायचा का, असा राजकीय पेच निर्माण झाला आहे.
शिरुर – हवेली व आंबेगाव – शिरुर हे मतदारसंघ निर्माण झाल्यापासून अनेकवेळा शिरुरमधील महत्त्वाच्या संस्थांच्या प्रमुख पदांच्या वाटपात राजकीय पेच निर्माण झाले आहेत. त्यामुळे प्रत्येकवेळी सोयीस्कररित्या पदांचे वाटप झाले. परंतु, शिरुरमधील सर्वाधिक 67 गावे असलेल्या शिरुर-हवेली मतदारसंघातील गावांमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. त्याला कारणही तसेच आहे.
आंबेगाव-शिरुरमध्ये दिलीप वळसे-पाटील यांच्या रुपाने कायमच मंत्रीपद असल्यामुळे तेथील विकासाचा अनुशेष भरुन काढला जातो. याउलट शिरुर-हवेली मतदारसंघामध्ये सर्वाधिक भाग हा शहरी व बागायती असल्याने त्याचा योग्य समतोल राखून तालुक्यात विकासाची कामे ओढून आणून करावी लागतात. त्यामध्ये शिरुर-हवेलीचे आमदार, ऍड. अशोक पवार यांनी कायमच सरशी केली आहे.
त्यामुळे राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या शिरुर बाजार समितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आमदार पवारांना बळ देण्यासाठी बाजार समितीचे संचालक, शिक्रापूरचे आबाराजे मांढरे यांना किंवा राष्ट्रवादीच्या स्थापना काळातील न्हावरे येथील माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य व शिरुर बाजार समितीचे विद्यमान संचालक, ऍड. काकासाहेब (वसंतराव) कोरेकर यांना सभापतीपदाची संधी देणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
परंतु, बाजार समितीचे उपसभापती विश्वास ढमढेरे यांनी राजीनामा दिला नसल्यामुळे आमदार पवारांनी खेळी खेळली आहे. त्यामुळे शिरूर बाजार समितीच्या सभापती निवडीत राष्ट्रवादीच्या नेत्यांचे राजकीय कसब पणाला लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिरुर बाजार समितीवर राष्ट्रवादीचे संपूर्ण बहुमत आहे. त्यामुळे प्रमुख इच्छुकांमध्ये आबाराजे मांढरे, मानसिंग पाचुंदकर, काकासाहेब (वसंतराव) कोरेकर, शंकर जांभळकर यांचा समावेश आहे.
जांभळकरांसाठी शिवसेना पदाधिकाऱ्याचे साकडे
केंदूर-शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदासाठी राष्ट्रवादीच्या संचालकांनी कंबर कसली आहे. त्यातच संचालक शंकर जांभळकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिरूर-आंबेगावच्या शिवसेनेची अंगीकृत संघटना असलेल्या विद्यार्थी सेनेच्या तालुका संघटक असलेल्या गणेश ढोकले या पदाधिकाऱ्याने जांभळकर यांना शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी संधी मिळावी, यासाठी राज्य उत्पन्न शुल्क तथा कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून साकडे घातले आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.