पिंपरी – शहरात सोमवारी प्रचंड उकाडा जाणवत होता. पुणे वेधशाळेनुसार सोमवारी दुपारी कमाल तापमान 39.7 अंश सेल्सियस इतके नोंदविण्यात आले. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात खऱ्या उन्हाळ्याने जोर दाखविण्यास सुरुवात केली आहे.
सध्या “करोना’मुळे रस्त्यांवर शुकशुकाट असून नागरिक घरातच आहेत. तसेच “करोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कूलर, एसीचा वापर न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. त्यातच असह्य होत असलेला उकाडा नागरिकांना चांगलाच त्रस्त करत आहे. सोमवारी कमाल तापमान 39.7 तर किमान तापमान 22.3 अंश सेल्सियस इतके नोंदविण्यात आले आहे.
वेधशाळेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, यापुढे पाऱ्याचा आलेख चढाच राहणार आहे. मंगळवारी पारा 41 अंशांपर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून. पुढे आठवडाभर कमाल तापमान 40 अंश राहण्याची शक्यता आहे. तसेच या दरम्यान आकाश अंशतः ढगाळ असण्याची शक्यता असल्याने उकाडा अधिकच वाढू शकतो.