मिलावौकी – अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता जेमतेम काही दिवस राहिले असताना तेथील दोन्ही उमेदवारांमध्ये आरोपप्रत्यारोपाच्या फैरी जोर धरू लागल्या आहेत. आज येथील सभेत बोलताना अध्यक्ष ट्रम्प म्हणाले की विरोधी उमेदवार जो बिडेन यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे प्रसार माध्यमांनी दाबून टाकली आहेत. एका तांत्रिक कंपनीनेही त्यांना या प्रकरणात साथ दिली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
बिडेन यांना रशियाकडून साडेतीन दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची रक्कम मिळाली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडूनच बिडेन यांना ही रक्कम मिळाली असल्याचा आरोपहीं ट्रम्प यांनी केला. तथापि बिडेन यांनी त्यांचा हा आरोप साफ धुडकाऊन लावला आहे. प्रचारसभेपुर्वी व्हाईट हाऊस मध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की बिडेन यांची भ्रष्टाचार प्रकरणे प्रसार माध्यमांनी दाबून टाकली आहेत.
असा प्रकार यापुर्वी मी कधी पाहिला नव्हता असे ते म्हणाले. ही सारी पैसेवाली मंडळी असून त्यांनी पैशाच्या जोरावर सारी भ्रष्टाचाराची प्रकरणे झाकून टाकली आहेत असेहीं ट्रम्प यांनी नमूद केले. अमेरिकेत प्रसार माध्यमांना जी मोकळीक आहे त्याचा या माध्यम संस्थांनी दुरूपयोग चालवला असल्याची टीकाही त्यांनी केली.
ट्रम्प यांच्या चिरंजीवांनाही एका प्रचार सभेत असाच आरोप केला आहे. अमेरिकन प्रसार माध्यमांकडून बिडेन यांच्या बाजूने सध्या पक्षपात सुरू असल्याचा आरोपहीं त्यांनी केला. केवळ बिडेन हेच नव्हे तर त्यांचे चिरंजीव हंटर बिडेन हेही भ्रष्टाचारी आहेत असे ट्रम्प यांच्या चिरंजीवांनी म्हटले आहे.