कोथरूड (सागर येवले) नव्याने जाहीर झालेली प्रारूप प्रभाग रचना राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी अनुकुल ठरणार आहे. तर भारतीय जनता पार्टीला डोकेदुखी ठरणार आहे. विशेषत: भाजपचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा प्रभाग तोडत कोथरूड परिसराची दोन टोके एकमेकाला जोडण्यात आली आहेत. त्यामुळे मोहोळ यांना प्रभागात फिरताना दमछाक होणार आहे. तसेच, नव्याने समाविष्ट झालेले बावधन बुद्रुक गाव वेगळे केल्यामुळे येथील भाजपाच्या उमेदवारांना शह बसणार? अशी चर्चा आहे.
कोथरूडमधील तीन प्रभागामध्ये 8 भाजपचे, 2 कॉंग्रेस आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रत्येकी एक नगरसेवक आहेत. मात्र, नव्याने जाहीर झालेल्या प्रभाग रचनेमुळे कोथरूडमधील राजकीय गणीत बदलणार असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीतही प्रभाग क्र. 30 जयभवानीनगर- केळेवाडी, प्रभाग क्र. 31 कोथरूड गावठाण-शिवतीर्थनगर, प्रभाग क्र. 32 भुसारी कॉलनी- सुतारदरा आणि प्रभाग क्र. 33 बावधन खुर्द-महात्मा सोसायटी हे कोथरूडमधील चार प्रभाग सर्वाधिक चर्चेचे ठरणार आहेत.
महापौर मुरलीधर मोहोळ हे प्रभाग क्र. 33 मधून निवडणूक लढवू शकतात. कारण, त्याचा मुळच्या प्रभागातील 70 टक्के भाग या प्रभागामध्ये आहे. मात्र, “होम पिच’ असलेले वनाझ, गुजराथ कॉलनी, तेजसनगर, शास्त्रीनगर, आझादनगर, कोथरूड गावठाण, अलंकापूरी हा परिसरच तोडण्यात आला आहे.
हा प्रभाग जोशी रेल्वे संग्रहालय, कृष्णा हॉस्पिटल, रघुकुल सोसायटी येथून वरच्या बाजूला सहजानंद सोसायटी, महात्मा सोसायटी, चांदणी चौकातून थेट रामनदीपर्यंत हा प्रभाग जोडलेला आहे. त्यामध्ये बावधन खुर्दचाही सहभाग आहे. दरम्यान, बावधन खुर्द परिसरातील दोन नगरसेवक भाजपचे आहेत. हा प्रभाग फिरायचा झाला तर तब्बल 30 किलोमिटर फिरावे लागत आहे. त्यामुळे महापौरांना रोखण्यासाठी ही रणनिती आहे का? अशी चर्चा रंगली आहे.
प्रभागांची मोडतोड करून आणि निकष बदलून भाजपाला रोखता येईल, असे विरोधकांना वाटत असेल तर त्यांच्या भ्रमाचा भोपळा पुणेकरच फोडतील. गेल्या पाच वर्षांत पुणेकरांना केंद्रबिंदू ठेवूनच पक्षाने महापालिकेचा कारभार केलेला आहे. पुण्याच्या भविष्याचा वेध घेताना विविध महत्त्वाचे प्रकल्प गेल्या पाच वर्षात पूर्णत्वास नेले. मतदानरुपी साथ मतदार देतील हा विश्वास आहे. – मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे
हे “मातब्बर’ लढणार…
प्रभाग क्र. 30 जयभवानीनगर- केळेवाडी प्रभागातून कॉंग्रेसचे रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम आणि माजी उपमहापौर दीपक मानकर निवडणूक लढवतील. कोथरूड गावठाण-शिवतीर्थनगर प्रभागात पृथ्वीराज सुतार, योगेश मोकाटे, उमेश भेलके, शाम देशपांडे . भुसारी कॉलनी-सुतारदरा प्रभागात शंकर केमसे, विजय डाकले, भाजपचे किरण दगडे, अल्पना वरपे तर बावधन खुर्द- महात्मा सोसायटीत महापौरासह भाजपचे दिलीप वेडेपाटील. बावधन बुद्रुक हे पाषाणला जोडल्यामुळे या प्रभागात कुणाल वेडेपाटील, मंदार घुले, अभिजीत दगडे, सुर्यकांत भुंडे, दिलीप दगडे, पियुषा दगडे, गोरख दगडे, सचिन दगडे, प्रमोद निम्हण यासह अन्य इच्छुक रिंगणार येऊ शकतात.