करोनाबाबत दिला जगाला संदेश
बर्लिन – करोनाला पराभूत करण्याच्या इराद्याने अव्वल टेनिसपटू डस्टिन ब्राऊन याने येथील एका टेनिस कोर्टवर आपल्याच एका सहकारी टेनिसपटूबरोबर एक प्रदर्शनीय सामना खेळला. या सामन्याला प्रेक्षकांना मात्र उपस्थित राहण्याची परवानगी नव्हती. हा सामना केवळ हे दोन खेळाडू व एक पंच यांच्यात उपस्थितीत खेळविला गेला.
या सामन्यासाठी निरीक्षक तसेच बॉलबॉय देखील नव्हते. संपूर्ण कोर्ट रिकामे ठेवून खेळलेला हा सामना ब्राऊनने जिंकला. तसेच त्याने हा सामना खेळून करोनाच्या धोक्यावर देखील सकारात्मक मानसिकतेने मात करता येते हा संदेशही क्रीडाप्रेमींना दिला. हा सामना खेळताना खेळाडू, पंच यांनी मास्क लावले होते.
ब्राऊनची जागतिक टेनिसमध्ये फारशी प्रसिद्धी नव्हती. मात्र, त्याने जेव्हा 2015 साली बलाढ्य खेळाडू राफेल नदालचा विम्बल्डन या मानाच्या स्पर्धेत पराभव केला तेव्हापासून त्याला जायंट किलर म्हणून ओळखले जाऊ लागले. रविवारी खेळलेल्या या सामन्याद्वारे त्याने संपूर्ण जगाला करोनावर मात करण्यासाठी लढा द्या, असाही संदेश दिला.