श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील चन्नी आनंद, मुख्तार खान आणि डार यासीन या तीन छायाचित्रकारांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. अमेरिकेकडून दिला जाणारा तो पुरस्कार फिचर फोटोग्राफी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठीचा आहे. पुलित्झरने सन्मानित केले जाणारे तिन्ही छायाचित्रकार असोसिएटेड प्रेस (एपी) या वृत्तसंस्थेसाठी कार्यरत आहेत. मागील वर्षी ऑगस्टमध्ये केंद्र सरकारने कलम 370 हटवून जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केला.
त्यानंतर जम्मू-काश्मीरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्या काळातील जनजीवन तिन्ही छायाचित्रकारांनी त्यांच्या कॅमेऱ्यांमधून टिपले. ती छायाचित्रे जगभरात पोहचली. त्या कामगिरीने तिन्ही छायाचित्रकारांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली आहे. त्यांना जाहीर झालेला पुलित्झर हा पत्रकारितेतील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. पुलित्झर जाहीर झाल्याच्या वृत्ताने जम्मू-काश्मीरमधील तिन्ही छायाचित्रकार आपला आनंद लपवू शकले नाहीत. आता त्यांच्यावर विविध क्षेत्रामंधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुलित्झरवर नाव कोरणारे आनंद, खान आणि यासीन हे जम्मू-काश्मीरातील पहिलेच मानकरी ठरले आहेत.