जिल्ह्यात आजपासून बाजारपेठ होणार खुली

नगर -चौथ्या लॉकडाऊनमध्ये नगर जिल्ह्याचा समावेश नॉन रेड झोनमध्ये झाल्याने जिल्ह्यातील सर्वच दुकाने आता सुरू होणार आहेत. सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत ही दुकाने सुरू ठेवण्याचे सांगण्यात आल्याने नगरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. नगर शहरात डाळमंडई, आडते बाजार सुरू राहणार असले, तरी कापडबाजार व नवीपेठ मात्र बंद राहणार आहे.

त्यात प्रामुख्याने सर्व बाजारपेठा, दुकाने उघडण्यास, तसेच रिक्षा, टॅक्‍सी, जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले सलूनही सुरू होणार असून, विवाह, दशक्रिया विधीला 50 लोक उपस्थित राहू शकतात, असे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत.

राज्य शासनाने रेड झोन व नॉन रेड झोनमधील जिल्हे घोषित केले असून, त्यात नगर जिल्हा नॉन रेड झोनमध्ये समाविष्ट झाला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी बुधवारी जिल्ह्यात कोणत्या बाबी सुरू राहतील व कोणत्या बाबींना प्रतिबंध असेल, याबाबत आदेश काढले. त्यात प्रामुख्याने कंटन्मेंट झोन (ज्या भागात करोनाचे रुग्ण आढळले) वगळता आतापर्यंत बंद असलेल्या बाजारपेठा सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. याशिवाय सर्व दुकानेही उघडतील. मात्र याची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत असेल. अत्यावश्‍यक सेवेची दुकाने (मेडिकल, पेट्रोल पंप, एटीएम) मात्र त्यांच्या निर्धारित वेळत सुरू राहतील.

दुकानांत गर्दी झाल्याचे आढळल्यास दुकाने त्वरित बंद केली जातील. क्रीडा संकुले, तसेच इतर सार्वजनिक मोकळ्या जागा वैयक्तिक व्यायामासाठी खुल्या होतील. तथापि प्रेक्षक व सार्वजनिक जमावास बंदी असेल. जिल्हांतर्गत बससेवेला जास्तीत जास्त 50 टक्के क्षमतेसह व शारीरिक अंतर ठेवून व स्वच्छता विषयक उपाययोजनांसह परवानगी असेल. जिल्ह्यात अनेक व्यवहारांना परवानगी दिलेली असली, तरी कलम 144 अन्वये सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई राहील. अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तीच्या हालचालींवर, फिरण्यास सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत निर्बंध राहतील. सर्व सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक आहे. दुकानांत ग्राहकांमध्ये 6 फुटांचे अंतर राखावे व पाचपेक्षा जास्त ग्राहक एका ठिकाणी नसावेत, असे आदेशात म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.