कोथरूड परिसरातील घटनेने खळबळ
पुणे – लॉकडाऊन काळात दिल्लीत अडकल्यावर कंपनीचे पैसे खर्च केल्याने एका व्यवस्थापकाचे त्याच्या मालकाने अपहरण केले. यानंतर त्याला साथीदारांच्या मदतीने मारहाण करत गुप्तांगामध्ये सॅनिटायझर फवारले. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात मालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
याप्रकरणी सनील शिंदे (30, रा. कोथरुड) यांनी तक्रार दिली. त्यानुसार गणेश केंजळे, वैभव साबळे, सागर शिंदे यांच्यावर अपहरण करून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला.
तक्रारदार हे केंजळे यांच्या मालकीच्या पुणे आर्ट फेस्टिव्ह कंपनीत व्यवस्थापक आहेत. त्यांना 17 मार्च रोजी कार्यालयीन कामासाठी दिल्ली येथे पाठवले होते. या काळात लॉकडाऊन झाल्याने शिंदे तेथेच अडकले. या काळात कंपनीने दिलेले पैसे त्यांच्याकडून खर्च झाले. त्यांनी याची माहिती केंजळे याला दिली होती.
मागील महिन्यात सनील हे घोटावडे फाटाजवळील पेट्रोल पंपाजवळ उभे होते. त्यावेळी केंजळे आणि वैभव एका जीपमधून आले आणि त्यांनी सनील यांना “कंपनीचे पैसे खर्च का केले,’ असा जाब विचारत “पैसे आताच्या आता दे,’ अशी मागणी केली. त्यानंतर सनील यांना वाहनात बसवून कोथरुडच्या कार्यालयात नेले. तेथेदेखील सनील यांचा छळ करत मारहाण केली. तेथे सागर यालादेखील बोलावण्यात आले. त्यानेही शिविगाळ करत लाकडी पट्टीने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.