“जबाबदार विरोधी पक्षाच्या नेत्याने जे करायला नको तेच राहुल गांधी करतायेत”

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी साधला राहुल गांधींवर निशाणा

नवी दिल्ली : देशात गलवान खोऱ्यातील संघर्षावरून भाजपा विरूद्ध काँग्रेस यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. सीमेवरील संघर्षानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सातत्याने सरकारला प्रश्न विचारताना दिसत आहेत. राहुल गांधींकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांवरून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी ते सर्व करत आहेत, जे जबाबदार विरोधी पक्षाच्या नेत्यानं करायला नको,” असे म्हणत नड्डा यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध पूर्णपणे बिघडले असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे याच मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी सरकारवर टीका करत आहे. राहुल गांधी यांच्या टीकेचा भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी समाचार घेतला. नड्डा यांनी ट्विट करून राहुल गांधी यांना लक्ष्य केले. “राहुल गांधी संसदेच्या संरक्षण स्थायी समितीच्या एकाही बैठकीत सहभागी झाले नाहीत. मात्र, वेदनादायी गोष्ट ही आहे की, ते सातत्यानं देशाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर लष्कराच्या शौर्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. राहुल गांधी ते सगळ करत आहेत, जे एका जबाबदार विरोक्षी पक्षनेत्यानं करायला नको,” अशी टीका नड्डा यांनी केली आहे.

राहुल गांधी अशा वंशपरंपरेतून येतात, जिथे संरक्षणा संबंधित समित्यांचं काही स्थान नाही. फक्त आयोग चालतात. काँग्रेसमध्ये असे अनेक पात्रता असलेले नेते आहेत, ज्यांना संसदीय विषयांचं महत्त्व माहिती आहे, पण एक घराणे अशा नेत्यांना मोठं होऊ देणार नाही. हे खरोखर दुःखद आहे, असा हल्लाबोल नड्डा यांनी ट्विट करून काँग्रेसवर केला. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांनी भारत-चीन सीमावादावरून आक्रमक भूमिका घेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर ते आक्रमकपणे प्रश्न विचारताना दिसले. त्याचाच समाचार भाजपकडून घेण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.