विधानसभा अपक्ष लढणार – आशा बुचके

नारायणगाव – शिवसेना पक्ष विरोधी कोणती कारवाई केली की ज्यामुळे माझी पक्षातून हकालपट्टी करण्याची वेळ पक्षावर आली. मी पक्षविरोधी कोणती कारवाई केली याचे पुरावे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी द्यावे. पक्ष प्रमुखांना चुकीची माहिती दिल्याने माझ्यावर कारवाई केली गेली आहे. आढळराव यांचे पक्षाकडून पुनर्वसन होते, तर माझे का नाही? असा सवाल जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी शिवसेना पक्षप्रमुखांना पत्रकार परिषदेद्वारे केला आहे.

शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर आपली बाजू मांडण्यासाठी आशा बुचके यांनी नारायणगाव (ता. जुन्नर) येथे रविवारी (द्‌. 7) पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना बुचके भावनिक झाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब पाटे, अशोक पाटे, एकनाथ शेटे, देविदास भुजबळ, दिलीप गांजाळे, माजी सभापती संगीत वाघ, आशिष माळवदकर, ऋषी डुंबरे, महेंद्र सदाकाळ, राजेश मेहेर, गौरव खैरे, सरपंच अर्चना औटी, कैलास मनसुख, लहू पाबळे, योगेश तोडकर, पंडित मेमाणे, संतोष खंडागळे, सुनीता शिंदे, संगीता खैरे, सविता डावखर, ज्योती दुराफे, सुवर्ण बाळसराफ आदी शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते .

बुचके म्हणाल्या, पक्षाने विधानसभेसाठी अधिकृत उमेदवार जाहीर केला नसल्याने म्हणून पक्षाकडे उमेदवारी मागणे गैर नाही किंवा अपराध आहे का? 20 वर्षे पक्षासाठी जीवाचे रान करून पक्ष वाढविला. शिवसैनिकांच्या सुख दुःखात पाठीशी उभी राहिले. तालुक्‍यात पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपरिषद, जिल्हा परिषद अशा ठिकाणी शिवसेनेची सत्ता आणली. विद्यमान लोकप्रतिनिधिनी 2009 पासून पक्षात येण्याअगोदर शिवसेनेच्या विरोधात निवडणुकीमध्ये उमेदवार उभे केले होते. शिवसेनेत येण्याचे ठरविले होते मग सेनेच्या विरोधात का उमेदवार उभे केले. निष्ठवान शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी विधानसभा निवडणूक अपक्ष लढविणारच, अशी घोषणा बुचके यांनी यावेळी केली.

अनेक पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे
आशा बुचके यांच्या पत्रकार परिषदेत अनेक शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचे जाहीर केले. संतोष खैरे यांनी उपतालुका प्रमुख, पंचायत समितीचे शिवसेनेचे गटनेते दिलीप गांजळे यांनी पंचायत समिती सदस्य पदाचा, संतोष खंडागळे यांनी उपविभाग प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले.

Leave A Reply

Your email address will not be published.