पतियाळा, साकेत जिल्हा न्यायालयाची दारे पक्षकारांसाठीही बंद
नवी दिल्ली : तिस हजारी कोर्टाच्या आवारामध्ये वकील व पोलिस यांच्यात झालेल्या चकमकीचा निषेध करण्यासाठी सर्व सहा जिल्हा न्यायालयातील वकिलांनी बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी आपला संप सुरू ठेवला. काही न्यायालयांमधील खटल्यांसाठी आलेल्या पक्षकारांनाही प्रवेश नाकारला. वकिलांनी पटियाला हाऊस आणि साकेत जिल्हा न्यायालयांचे मुख्य दरवाजे बंद केले आणि सुरक्षेच्या कारणास्तव पक्षकारांना कोर्टाच्या आवारातही जाऊ दिले नाही.
रोहिणी जिल्हा कोर्टाच्या आवारात एका वकिलाने आपले कपडे काढून अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याची धमकी दिली. तर अन्य एक वकिल इमारतीवर चढला. या दोन्ही घटनांबाबत पोलिसांना पाचारण केले गेले नव्हते.
कोर्टाच्या आवारात सुरक्षेसाठी कोणीही पोलिस तैनात नाहीत, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पक्षकारांना कोर्टाच्या आवारात प्रवेश दिला जात नाही, असे दिल्ली बार असोसिएशनच्या सदस्यांनी सांगितले.
तिस हजारी कोर्टात मात्र पक्षकारांना प्रवेश दिला गेला. वकील शांततेने निदर्शने करत असल्याचे दिल्ली बार असोसिएशनचे सचिव ऍड. जयवीर सिंह चौहान यांनी सांगितले. गोळीबार आणि लाठीमार करणाऱ्या पोलिसांना अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे एका वकिलाने सांगितले.
साकेत कोर्टाबाहेर मोटरसायकलवरील गणवेशधारी पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात एका व्हिडिओच्या आधारे दोन एफआयआर नोंदविण्यात आली होती.