पंचकुला : बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्यात अंबाला कारागृहात शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमित राम रहीम सिंगची निकटची सहकारी हनीप्रीतला पंचकुला न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. डेरा हिंसाचारप्रकरणी पंचकुला न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आर. एस. चौहान यांनी हा निर्णय दिला.
राम रहिमचा उजवा हात मानली जाणारी हनीप्रीत विरोधात ऑगस्ट 2017 मध्ये हरयाणातील डेरा सच्चा सौदाच्या आश्रमाबाहेर हिंसाचार घडवून आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हनीप्रीतशिवाय राम रहिमचा जवळचा सहकारी सुरिंदर धिमान, चमकौर सिंह, दान सिंह, दिलावर सिंह, राकेश कुमार, खौरातील लाल आणि गोविंद राम यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले होते.
विशेष म्हणजे यापूर्वीच्या सुनावणीवेळी पंचकुला न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश संजय संधीर यांनी हनीप्रीतसह 39 लोकांविरोधातील देशद्रोहाचे खटले रद्द केले होते. देशद्रोहाच्या आरोपांव्यतिरिक्त हनीप्रीतवर जामीनपात्र आरोप दाखल होते. त्यामुळे तिला आज हिंसाचार प्रकरणात कोर्टाने जामीन मंजूर केला.
डेरा हिंसाचारप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) हनीप्रीतसह 43 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता.