“वेला’ या पाणबुडीचे जलावतरण

नवी दिल्ली – स्कॉर्पिन वर्गातल्या “वेला’ या चौथ्या पाणबुडीचे आज मुंबईत जलावतरण झाले. संरक्षण (उत्पादन) सचिव डॉ. अजय कुमार यांच्या पत्नी वीणा अजय कुमार यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. माझगांव डॉक शिपबिल्डर्सने भारतीय नौदलासाठी ही पाणबुडी बांधली आहे.

भारतीय नौदलात ही पाणबुडी समाविष्ट करण्यापूर्वी बंदरात आणि समुद्रातही या पाणबुडीच्या कठोर चाचण्या घेण्यात येतील. स्कॉर्पिन श्रेणीतल्या सहा पाणबुड्या बांधण्यासाठी आणि तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी फ्रान्समधल्या नेव्हल ग्रुपशी करार झाला आहे. माझगांव गोदीत सध्या आठ युद्ध नौका आणि पाच पाणबुड्या बांधण्याचे काम सुरु आहे. स्कॉर्पिन वर्गातल्या पाचव्या पाणबुडीलाही लवकरच लॉंच केले जाईल, असे माझगांव डॉकच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. “वेला’च्या आगोदर स्कॉर्पिन वर्गातल्या “कलावरी’, “खांदेरी’, “करंज’ या पाणबुड्यांचे जलावतरण करण्यात आलेले आहे. त्यातील “कलावरी’ या पाणबुडीला नौदलाच्या ताफ्यात दाखल करून घेतले गेले आहे.

“आयएनएस वेला’ ही पाणबुडी सर्वात प्रथम 31 ऑगस्ट 1973 मध्ये नौदलात ताफ्यात दाखल झाली आणि पुढे 37 वर्षे ती सेवेत होती. त्यानंतर 25 जून 2010 रोजी ही पाणबुडी संरक्षण सेवेतून थांबवण्यात आली. भारताची ही सर्वात जूनी पाणबुडी होती. आता “वेला’ याच नावाने नवीन मशिनरी आणि तंत्रज्ञान वापरून नवीन पाणबुडी नौदलाच्या सेवेसाठी सिद्ध होत आहे, असे माझगांवच्या डॉकच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.