करंजगाव -प्रतिकुल परिस्थितीपुढे हार न मानता कातकरी समाजातील एका युवकाने पोटाची खळगी भरत असताना निवाऱ्यासाठी स्मशानभूमीचा आसरा घेतला आहे. पत्नी व दोन वर्षांच्या चिमुकलीसह कामशेतच्या स्मशानभुमीत त्याचे काही दिवसांपासून वास्तव्य आहे. रात्री मीठ-मिरची केल्यानंतर, रात्रीाचा निवारा या स्मशानात घेत, उजाडलेल्या पहाटेबरोबर पोटाची खळगी भरण्यासाठी हे कुटुंब पुन्हा बाहेर पडत आहे. शिवा गंगाराम वाघमारे असे या जिगरबाज युवकाचे नाव आहे.
मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कातकरी समाजाचे तालुक्यातील दुर्गम भागातील कातरकरी वस्त्यांवर वास्तव्य आहे. या समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने वीटभट्टीवर मजुरी करण्याबरोबरच नदी, तलाव व ओढ्यताच्याठिकाणी मासेमारी करून उपजिवीका करण्यावर भर आहे. शिवा वाघमारेदेखील याच समाजाचा एक भाग आहेत. सध्या त्याचे राऊतवाडीत त्याच्या मामाकडे वास्तव्य होते. मात्र, पावसाळा सुरू झाल्याने तालुक्यातील वीटभट्ट्यांचे काम बंद झाले आहे. त्यामुळे शिवा आता परंपरागत मासेमारी व्यवसायाकडे वळाला आहे.
सध्या शिवाची उपजिवीका मासेमारीवर सुरू आहे. आपल्या पत्नी व मुलीसह दिवसभर खेकडे पकडण्यासाठी तो दिवसभर जात आहे. तयाला दिवसभरात कधी सहा तर कधी आठ खेकडे मिळतात. सहा खेकड्यांना बाजारात 200 रुपये मिळतात. तर काही वेळा 150 रुपयेदेखील मिळतात.
त्यातील एक दोन खेकडे रात्रीच्या जेवणासाठी वापरली जातात. खेकडे विक्रीतून मिळणाऱ्या रक्कमेतून ठराविक रक्कमवर्षाकाठी ठेवली जाते. तर काही रक्कम दररोजच्या तांदूळ, तेल, मिरची व इतर किरणा वस्तु घेण्यासाठी वापरली जाते. तर घरभाड्यासाठी पुरेशी रक्कम नसल्याने शिवाने त्याच्या कुटुंबासह कामशेत स्मशानभुमीत वास्तव्यास आहे.
मी राऊतवाडीला मामा-मामीकडे राहत आहे. वर्षभरातील आर्थिक तजवीज करण्यासाठी वीटभट्टीवर काम करतो. तसेच पावसाळ्यात मासे व खेकडे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने, त्याचा संसाराला हातभार लागतो. मावळात सध्या राहण्याची सोय नसल्याने, गेली काही दिवसांपासून मी माझ्या कुटुंबासोबत स्मशानभूमीमध्ये राहत आहे.
– शिवा गंगाराम वाघमारे
स्मशानभूमीबाबत समाजात फारसे चांगले बोलेल जात नाही. मात्र, अठरा विश्व दारिद्य्र असलेल्या कातकरी समाजातील शिवा वाघमारे याने कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी थेट स्मशानभुमीचा आसरा घेतला आहे. या समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक प्रगतीकरिता शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
– सोपान खांडभोर