नगर – महापालिकेचे नगरसेवक अनिल शिंदे व सुभाष लोंढे सोडता इतर नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला नाही. नगरसेवक योगीराज गाडे हे वैयक्तिक कामानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला नाही. विनाकारण गैरसमज पसरवून बदनामी केली जात आहे. नगरसेवक अमोल येवले व योगीराज गाडे हे शिवसेनेत राहणार असल्याची स्पष्टोक्ती देत शिंदे गटांत गेलेल्यांनी दोन दिवसांत आपली भूमिका जाहीर करावी, अन्यथा त्यांचा अहवाल मातोश्रीला पाठविणार असल्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नगरसेवक अनिल शिंदे, सुभाष लोंढे, यांच्यासह शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी भेट घेतली होती. याशिवाय जिल्हाप्रमुख गाडे यांचे चिरंजीव नगरसेवक योगीराज गाडे व बंधू रमाकांत गाडे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे ट्विट मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्याचे खळबळ उडाली.
जिल्हाप्रमुख गाडे यांचे घरातील सदस्य शिंदे गटात गेल्याने त्यांच्यावर आरोप होऊ लागल्याने त्यांनी आज पत्रकार परिषदेत घेऊन स्पष्टीकरण दिले. जिल्हाप्रमुख गाडे म्हणाले, शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून 18 वर्षांपासून काम करत आहोत. पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे काम केले.साखर सम्राटांच्या जिल्ह्यात शिवसेना वाढविली. खासगी कामानिमित्ता मुलगा योगीराज गेला असताना जाणीवपूर्वक गाडे कुटुंबाला बदनाम करण्यात येत आहे. नगर शहरातील फक्त अनिल शिंदे आणि सुभाष लोंढे हे दोन विद्यमान नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत. इतर माजी नगरसेवक आहेत. दोन दिवसांत त्यांनी उत्तर दिले नाही तर जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नावे वरिष्ठ कार्यालयाला कळविणार असल्याचे सांगितले.
नगरसेवक योगीराज गाडे म्हणाले की, माझ्या खाजगी कामासाठी मी आणि नगरसेवक अमोल येवले मुंबईत गेलो होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझे काम सांगितले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या निधी मागणीच्या निवेदनावर सही केली पण ज्यावेळी नगरच्या लोकांचा प्रवेश झाला त्यावेळी मी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो. आजपर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्या समर्थनार्थच भूमिका कायम मांडत आलेलो आहे. मी शिवसेनेतच आहे आणि राहणार आहे. विक्रम राठोड यांनी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या कामाविषयी नाराजी व्यक्त करत त्यांना बदलणार असल्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. यावेळी संदेश कार्ले, शरद झोडगे, विक्रम राठोड, गिरीश जाधव, नगरसेवक अमोल येवले उपस्थित होते.