- सौरऊर्जेचा यशस्वी प्रयोग : घरकुल संकुलात साधारण 160 इमारती
- पाच इमारतींमध्ये पाण्याची मोटर, लिफ्ट, सार्वजनिक दिवे सौरऊर्जेवर चालू
चिखली – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील चिखली येथील आर्थिक दुर्बल घटकातील श्रमिकांसाठी बांधलेल्या घरकुल संकुल या ठिकाणी पाच इमारतींमध्ये सौरऊर्जेचा वापर सुरू झाला आहे. पाणीपुरवठा मोटर, लिफ्ट आणि सोसायटीचे सार्वजनिक लाइट सौरऊर्जेवर चालू आहेत. यामुळे प्रत्येक सोसायटीचे दरमहा 15 हजार रुपये वीज बिल वाचत आहे. त्यामुळे घरकुलवासीयांची आर्थिक बचत होण्यास मदत होत आहे.
महापालिकेने उभारलेल्या घरकुल संकुलात साधारण 160 इमारती आहेत. त्यातील पाच इमारतींसाठी प्रायोगिक तत्त्वावर सौरऊर्जा प्रकल्प साकरला आहे. लॉकडाऊनमुळे हा प्रकल्प सुरू होण्यास वेळ लागला परंतु मागील एक महिन्यापासून हा प्रकल्प सुरळीत सुरू झाला असून या इमारतींचे दरमहा येणारे 15 हजार रुपयांचे बिल शून्य रुपये आले आहे. त्यामुळे घरकुलवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
कंपन्यांकडून मदतीचा हात
केंद्र, राज्य आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने घरकुल संकुल प्रकल्प उभारण्यात आला आहे. परंतु येथील एका इमारतीसाठी विजेवर चालणारी विद्युत मोटार, लिफ्ट तसेच जिन्यामध्ये लावण्यात आलेल्या दिव्यांचे लाइटचे बिल एका इमारतीसाठी साधारण 15 हजार रुपये येत होते. या ठिकाणी घरकुल मिळालेल्या नागरिकांसाठी सोसायटीचा महिन्याचा खर्च अथवा सोसायटी भरणे अशक्य होत होते. त्यातच इमारतीचा इतर खर्च यामुळे येथील रहिवासी वैतागले होते. परंतु पितांबरी कंपनी, पुणे सहवास रोटरी क्लब आणि डेटम कंपनी यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रकल्प साकारण्यात आला. त्याला घरकुलवासीयांनी देखील मोलाची साथ दिल्याने आज सौरऊर्जा प्रकल्प यशस्वीपणे सुरू झाला आहे.
पितांबरी कंपनीचे सीएमडी रवींद्र प्रभुदेसाई, सोलर डीव्हीजन हेड शमिंदर कुलकर्णी, सीईओ पुजारी, मिलिंद कडगावकर तसेच रोटरी क्लबचे किरण इंगळे, प्रकाश अवचट, डेटम कंपनीचे संतोष जोशी, मेजर विचारे या तज्ज्ञ मंडळींनी हा प्रकल्प कार्यान्वित केला आहे.
एका इमारतीसाठी साडेपाच लाख खर्च
सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी एका इमारतीसाठी साधारण साडेपाच लाख खर्च येणार होता. त्यामुळे रोटरी व इतर कंपन्यांनी आपल्या सीएसआर फंडातून रक्कम देऊन व इमारतीचे सभासद यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये घेऊन हा प्रकल्प उभारण्यात आला. त्यामुळे घरकुलवासीयांना प्रत्येक महिन्याला लाइटबिलासाठी 15 हजार रुपये भरावे लागत होते तो खर्च कमी झाला आहे. त्यामुळे या पाच इमारतींचा मिळून महिन्याला 75 हजार रुपयांची बचत होत आहे. तर वर्षाला नऊ लाखांची बचत होत आहे.
प्रकल्पाची 25 वर्षांची मुदत
घरकुलमध्ये उभारलेल्या प्रकल्पाची मुदत 25 वर्षांची आहे. त्यामुळे पाच इमारतींचा वर्षाला नऊ लाख रुपये याप्रमाणे 25 वर्षांची बचत सव्वादोन कोटी रुपयांची होणार आहे. त्यासाठी प्रत्येक सभासदाला केवळ पाच हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागली आहे.
शहरातील पहिला प्रकल्प
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक मगर यांनी सांगितले की, स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि कंपनीच्या सीएसआर फंडातून निर्माण झालेला घरकुल संकुलातील सौरऊर्जा प्रकल्प हा शहरातील पहिला प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे घरकुलवासीयांची मोठी आर्थिक बचत होण्यास मदत होणार आहे. तेच पैसे नागरिक आपल्या संसारासाठी तसेच मुलांच्या शिक्षणासाठी वापरू शकतात. पाच इमारतींसाठी सुरू केलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे दररोज 50 किलोवॉट वीजनिर्मिती केली जाते. ती महावितरणकडे पाठवून दिली जाते. असे सामाजिक कार्यकर्ते अशोक मगर यांनी सांगितले.