नगर, (प्रतिनिधी) – नगर अर्बन बॅंक गैरव्यावहार प्रकरणी मुख्य कर्ज तपासणी अधिकारी मनोज फिरोदिया व कर्जदार प्रवीण लहारे याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. अर्बन बँक घोटाळा प्रकरणातील थकीत कर्जदारांची आता पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने धरपकड सुरु केली असून कर्ज रकमेचा दुरुपयोग केल्याचा ठपका असलेल्या एका कर्जदाराला मंगळवारी (दि.२०) ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे आता थकीत कर्जदारांना पळता भुई थोडी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान आज अटकेतील आरोपींनी केलेल्या जमीन अर्जाबाबत सुनावणी होती. आज कोणाच्या जामिनावर कोणताच निर्णय झाला नाही, त्यामुळे अटकेत असलेले अशोक कटारिया, अनिल कोठारी, राजेंद्र लुणिया, प्रदीप पाटील, सी. ए. शंकर अंदानी या आरोपींचा जेल मधील मुक्काम काही दिवस वाढला आहे. न्यायालयाने पुढील सुनावणी दि. २९ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
अर्बन बँकेच्या २९१ कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी आत्तापर्यंत बँकेतील अधिकारी आणि संचालक यांना अटक झालेली आहे. मात्र प्रथमच या घोटाळ्यात एका कर्जदराला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे आता ज्या कर्जदारांनी खोटे कागदपत्र देऊन कर्ज घेतले आहेत, अशा कर्जदारांवर आर्थिक गुन्हे शाखेची नजर असणार आहे.
या प्रकरणात एकूण १०५ आरोपी असून, यापैकी माजी तज्ज्ञ संचालक शंकर अंदानी यास अटक करण्यात आली आहे. नगर अर्बन बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी अध्यक्षांसह दोन संचालकांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक दिवटे यांच्या पथकाने कारवाई केली.