इटलीचा सुपरस्टार मिशेल मोरोन लवकरच बॉलीवूडमध्ये येणार आहे. अलीकडेच तो “365 डेज’ या सिनेमात दिसला होता. त्याने आपल्या कामाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. एका कादंबरीवर आधारित या सिनेमानंतर मिशेल सगळ्या जगात लोकप्रिय झाला. त्याच्या लुक्सची सर्वत्र चर्चा व्हायला लागली आहे.
वयाच्या 11 व्या वर्षीच त्याने थिएटरमध्ये काम करायला सुरुवात केली होती. आतापर्यंत त्याने 8 सिनेमांमध्ये काम केले आहे. पण आंतरराष्ट्रीय सिनेमामध्ये काम करण्याची संधी त्याला मिळालेली नव्हती. “365 डेज” च्या निमित्ताने त्याला ही संधी मिळाली आहे. त्या संधीचे रूपांतर त्याला आता सोन्याच्या संधीत करायचे आहे. तो एक ऍक्टरसह सिंगर, मॉडेल आणि फॅशन डिझायनरदेखील आहे.
आपल्याला बॉलीवूडबद्दल आकर्षण वाटत असल्याचे त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले. बॉलीवूडमध्ये काम करण्याची त्याची इच्छा आहे आणि त्याने आपल्या एजंटना बॉलीवूडमधील निर्मात्यांशी संपर्क साधायला सांगितले आहे. त्यांचे काम वेगात सुरू आहे आणि कदाचित एखाद्या ऍक्शन रोलसाठी त्याला विचारले जाऊ शकते.