गुवाहाटी: करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यात नवीन करोनाबाधित आणि मृत्यू यांचे कमी होणारे प्रमाणही कमी झाले आहे. हे सगळं जरी दिलासा देणारे असले तरी केवळ निष्काळजीपणामुळे काही रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशीच एक घटना आसाममधील गुवाहाटीमध्ये घडल्याचे म्हटले जात आहे. गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर डॉक्टर नसल्यामुळे १२ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
जीएमसीएचचे डीन अभिजित सरमा यांनी सांगितले की, करोनाबाधित १२ रुग्णांपैकी ९ रुग्ण आयसीयूमध्ये होते, तर तीन रुग्ण कोव्हिड वॉर्डमध्ये होते. त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली होती. मात्र, अन्य माहितीनुसार, या रुग्णांची ऑक्सिजन पातळी खालावत गेली, तेव्हा डॉक्टर ड्युटीवर उपस्थित नव्हते.
मृत पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, रात्रपाळीला अनेकदा डॉक्टर ड्युटीवर येतच नाहीत. दुसरीकडे, या घटनेची माहिती मिळताच आसामचे आरोग्यमंत्री केशव महंत यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला. याप्रकरणी वरिष्ठ डॉक्टरांची एक बैठक बोलावण्यात आली.
या रुग्णांना उपचारांसाठी दाखल करण्यात उशीर झाला होता. या रुग्णांना दाखल करून घेण्यात आले, तेव्हाच त्यांची ऑक्सिजन पातळी प्रमाणापेक्षा अधिक कमी झाली होती. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. ऑक्सिजन सपोर्ट देऊनही त्यांची ऑक्सिजन पातळी वाढत नव्हती. तसेच काही रुग्णांना एकापेक्षा अधिक व्याधी झालेल्या होत्या. याशिवाय यापैकी कुणीही कोरोनाचा एकही डोस घेतला नव्हता, अशी सारवासारव सरमा यांनी केली आहे.