उद्योगमंत्र्यांकडून कार्यवाहीचे आश्वासन
वाघोली – भाजप नेते राहुल कुल, प्रदीप कंद यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली प्रादेशिक योजनेतील 30 मीटर रुंदीचा खांदवेनगर जकात नाका ते कटकेवाडी येथे पुणे नगर रस्त्यास वाघोली बाह्यवळण रस्ता कधी होणार, असा सवाल नागरिकांकडून केला जात होता. हाच प्रश्न शिरूरचे आमदार अशोक पवार व दौंडचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत उपस्थित करून वाघोलीची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी तातडीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली. याबाबतीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारतर्फे 34 गावांचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत बैठक आयोजित करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन सभागृहाला दिले. त्यामुळे वाघोलीच्या विविध प्रश्नांसोबतच वाहतुकीचा प्रश्न देखील विधानसभेत गाजला आहे.
आमदार राहुल दादा कुल यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली प्रादेशिक योजनेतील 30 मी रुंदीचा खांदवेनगर जकात नाका ते कटकेवाडी येथे पुणे नगर रस्त्यास वाघोली बाह्यवळण करून जुळणारा रस्ता करण्यासाठी पीएमआरडीए आयुक्त राहुल मेहवाल यांची भेट घेत नुकतीच चर्चा करण्यात आली आहे.
वाघोली गावाची लोकसंख्या सुमारे तीन लाखांच्या आसपास पोहचली असून या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न जिल्हाभर गाजत आहे. वाघोलीमधून पुणे- नगर – छत्रपती संभाजीनगर महामार्ग जात असून या महामार्गावर रांजणगाव, सणसवाडी , कोरेगाव एमआयडीसी आहे. वाघोली लोणीकंद, भावडी, फुलगाव, इतर भागात मोठ्या प्रमाणावर क्रशर आहेत.याची वाहतूक करणाऱ्या अनेक गाड्या आहेत.
अनेक शाळा, महाविद्यालय, कॉलेज, गोडाऊन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. पुणे- शिरूर रस्त्यावर ट्रॅफिक काउन्ट दिवसाला 66746 झउण आहे. वाघोली साठी कोणताही बायपास नाही. पुणे- नगर रस्त्यावरील वाघोली येथील वाहतूक कोंडीची परिस्थिती बिकट झाली आहे.
पीएमआरडीएकडून पर्याय रस्ता म्हणून दक्षिण बाजूस 30 मीटर रुंदीचा प्रादेशिक योजनेतील रस्ता प्रस्तावित केला आहे. हा रस्ता करणे गरजेचे असून रस्ता झाला तर वाघोलीमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल, यासाठी हा रस्ता लवकर करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.