सेऊल – भारतीय महिला हॉकी संघाने अनुभवी ड्रॅग-फ्लिकर गुरजीत कौरने केलेल्या तब्बल पाच गोलच्या जोरावर आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत सलामीच्या सामन्यात थायलंडचा 13-0 असा दणदणीत पराभव केला.
टोकियो ऑलिम्पिकनंतर भारताचा महिला हॉकी संघ काही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेतून विश्रांती घेतलेल्या राणी रामपालच्या अनुपस्थितीत सविता पुनिया या संघाचे नेतृत्व करत आहे.
सामना सुरू झाल्यावर गुरजीतने दुसऱ्याच मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकचे गोलमध्ये रूपांतर केले. त्यानंतर 7 व्या मिनिटाला वंदना कटारियाने दुसरा गोल केला. 14 व्या मिनिटाला लिलिमा मिन्जने संघाचा तिसरा गोल नोंदवला. गुरजीत आणि ज्योती यांनी 14 व्या आणि 15 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत संघाला 5-0 अशी आघाडी प्राप्त करून दिली.
दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये आंतरराष्ट्रीय हॉकीत पदार्पण करणाऱ्या राजविंदर कौरने 16 व्या मिनिटाला गोल केला, तर गुरजीतने 24 व्या मिनिटाला वैयक्तिक तिसरा व संघाचा 7 वा गोल केला. लिलिमाने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत संघाची आघाडी 8-0 अशी वाढवली.
पुन्हा एकदा गुरजीत कौरने आपली चाल यशस्वी सिद्ध करताना 25 व्या मिनिटाला गोल करत पहिला हाफ संपला तेव्हा संघाला 9-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ज्योतीने 36 व्या, तर सोनिकाने 43 व्या मिनिटाला गोल केला. दुसरा हाफदेखील भारताच्याच वर्चस्वाचा ठरला. त्यात मोनिकाने 55 व्या मिनिटाला गोल केला. गुरजीतने 58 व्या मिनिटाला आपला 5 वा, तर संघाचा 13 वा गोल नोंदवला.