बाली – भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला पुन्हा एकदा जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत (बीडब्लूएफ) विजेतेपद मिळवण्यात अपयश आले.
भारताकडून दोन ऑलिम्पिक पदके मिळवलेल्या सिंधूला या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मात्र पराभवाचा सामना करावा लागला. तिने एकदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. यंदा या स्पर्धेचे दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्याचे तिचे स्वप्न मात्र भंग पावले.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूला दक्षिण कोरियाच्या ऍन सियोंगकडून 21-16 21-12 असा सरळ दोन गेममध्ये पराभव पत्करावा लागला. सियोंगने सिंधूला नुकत्याच पार पडलेल्या डेन्मार्क ओपन स्पर्धेतही पराभूत केले होते. यापूर्वी 2018 साली या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारी सिंधू ही एकमेव भारतीय बॅडमिंटनपटू आहे.