#INDvNZ 2nd Test Day 3 | भारत मालिका विजयाच्या उंबरठ्यावर

विजयासाठी 540 धावांच्या लक्ष्यासमोर न्यूझीलंडच्या 5 बाद 140 धावा

मुंबई  – भारतीय संघाने आपला दुसरा डाव 7 बाद 276 धावांवर घोषित केला व न्यूझीलंडसमोर विजयासाठी 540 धावांचे लक्ष्य ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात रविवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा 5 बाद 140 धावा झाल्या असून, त्यांना विजयासाठी अद्याप तब्बल 400 धावांची गरज आहे. मात्र, गोलंदाजीचा आलेख पाहता भारतीय संघ या सामन्यासह दोन कसोटी सामन्यांच्या मालिका विजयाच्या उंबरठ्यावर असून, त्यांना केवळ 5 गडी बाद करण्याची आवश्‍यकता आहे.

तत्पूर्वी, भारतीय संघाने रविवारी दुसऱ्या दिवशीच्या बिनबाद 69 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यावर पहिल्या डावातील दीडशतकवीर मयंक आग्रवालने चेतेश्‍वर पुजाराच्या साथीत संघाला शतकी सलामी दिली. पुजारा मात्र अर्धशतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला. मयंकने मात्र आपले अर्धशतक पूर्ण केले. एकाच कसोटीत शतक व अर्धशतक फटकावत त्याने आपले नावही अशी कामगिरी केलेल्या दिग्गजांच्या यादीत जमा केले. त्याने 9 चौकार व 1 षटकार यांच्या मदतीने 62 धावांची खेळी केली.

शुभमन गिलने 47, कर्णधार विराट कोहली 36 व तळात अक्‍सर पटेलने 41 धावांची आक्रमक खेळी केली. अक्‍सरने पहिल्या डावात अर्धशतक साकारले होते. त्याने या डावातही आक्रमक फलंदाजी करताना अवघ्या 26 चेंडूत 3 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली. श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा व जयंत यादव यांनी मात्र निराशा केली. अखेर कर्णधार कोहलीने आपला दुसरा डाव 7 बाद 276 धावांवर घोषित केला व न्यूझीलंडसमोर विजयासाठी 540 धावांचे मोठे आव्हान ठेवले. न्यूझीलंडकडून पुन्हा एकदा भारतीय वंशाच्या फिरकी गोलंदाज एजाज पटेलने 4 गडी बाद केले. राचीन रवींद्रने 3 गडी बाद केले.

विजयासाठी 540 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या फलंदाजांची भारताचा अनुभवी ऑफ स्पीन गोलंदाज रवीचंद्रन अश्‍विनने त्रेधा उडवली. त्यांचे 3 फलंदाज बाद झाले तेव्हा त्यांच्या अवघ्या 55 धावा फलकावर लागल्या होत्या. कर्णधार टॉम लॅथम 6 धावांवर परतला. अनुभवी फलंदाज रॉस टेलरनेही सहा धावा केल्या. चांगला खेळत असलेला विल यंग 20 धावांवर बाद झाला. त्यानंतर डॅरेल मिशेल व हेनरी निकोल्स यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मिशेल अर्धशतक पूर्ण झाल्यावर अनावश्‍यक फटका मारण्याच्या प्रयत्नात 60 धावांवर बाद झाला. टॉम ब्लंडलही वेगाने धाव घेत असताना धावबाद झाला व त्यांची 5 बाद 129 अशी बिकट स्थिती बनली. एका बाजूने निकोल्सने संयमी खेळी करताना राचीन रवींद्रला हाताशी घेत तिसऱ्या दिवस अखेर संघाचे आणखी नुकसान होऊ दिले नाही. खेळ थांबला तेव्हा निकोल्स 36, तर रवींद्र 2 धावांवर खेळत आहेत. सामन्याचे अद्याप दोन दिवस बाकी असून, त्यांना या सामन्यासह दोन कसोटींची ही मालिकाही गमवावी लागणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. भारताकडून रवीचंद्रन अश्‍विनने 3 गडी बाद केले, तर अक्‍सर पटेलने 1 बळी घेतला.

संक्षिप्त धावफलक –

भारत पहिला डाव – 325. न्यूझीलंड पहिला डाव – 62. भारत दुसरा डाव – 70 षटकांत 7 बाद 276 घोषित. (मयंक आग्रवाल 62. चेतेश्‍वर पुजारा 47, शुभमन गिल 47, विराट कोहली 36, अक्‍सर पटेल नाबाद 41, एजाज पटेल 4-106, राचीन रवींद्र 3-56). न्यूझीलंड दुसरा डाव – 45 षटकांत 5 बाद 140 धावा. (डॅरेल मिशेल 60, हेनरी निकोल्स खेळत आहे 36, राचीन रवींद्र खेळत आहे 2, रवीचंद्रन अश्‍विन 3-27, अक्‍सर पटेल 1-42).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.