#ICCWorldCup2019: निर्धाव चेंडूंचे महत्त्व पटले- कमिन्स

टॉंटन: कसोटीत निर्धाव चेंडूंबाबत आपण फारसे गांभीर्याने पाहात नाही. मात्र, मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये प्रत्येक निर्धाव चेंडू किती महत्त्वाचा असतो याचे महत्त्व मला येथे पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्याद्वारे लक्षात आले असे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने सांगितले.

विजयासाठी पाकिस्तानने शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक पवित्रा घेतला होता, त्यावेळी कमिन्स याने धावा रोखण्याबरोबरच विकेट्‌सही घेण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली होती. त्याने 33 धावांमध्ये 3 गडी बाद केले होते.

कमिन्स याने सांगितले की, पाकिस्तानच्जा फलंदाजांनी 308 धावांचे लक्ष्य आटोक्‍यात आणले होते, त्यावेळी माझ्याकडे कर्णधार ऍरोन फिंच याने चेंडू सोपविला. पाकिस्तानच्या फलंदाजांवर अंकुश कसा आणता येईल याबाबत आम्ही डावपेच आखले आणि आमच्या प्रयत्नांना यश मिळाले. प्रत्येक संघातील शेवटच्या खेळाडूपर्यंत फटकेबाजी करण्याची क्षमता असते. त्यामुळेच मी अचूक टप्प्यावर मारा करण्यावर भर दिला. सुदैवाने मला विकेट्‌सही मिळाल्या.
डेव्हिड वॉर्नर याने या सामन्यात धडाकेबाज शतक टोलविले. त्याचे कौतुक करीत कमिन्स याने सांगितले की, आमच्या संघाचा तो अविभाज्य घटक आहे. चौकार व षटकारांबरोबरच एकेरी व दुहेरी धावा काढण्याबाबत त्याची चपळाई वाखाणण्याजोगी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.