वॉशिंग्टन- अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहात डेमॉक्रेटिक खासदारांनी महाभियोगाला मान्यता देण्यासाठी केलेले मतदान म्हणजे अमेरिकेच्या लोकशाहीवर केलेला हल्ला असल्याची टीका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. 435 सदस्यसंख्या असलेल्या अमेरिकी कॉंग्रेसच्या कनिष्ठ सभागृहानेया महाभियोगाच्या प्रस्तावाला बहुमताने नुकतीच मान्यता दिली आहे.
यावर खुली सुनावणी व्हावी आणि सदस्यांना साक्षीदारांची उलटतपासणी घेता यावा, यासाठी आधुनिक अध्यक्षीय इतिहासात प्रथमच 232 विरुद्ध 196 मतांनी हा प्रस्ताव पारित करण्यात आला. प्रतिनिधी सभागृहात डेमॉक्रेट्सकडे 233 सदस्यांसह बहुमत आहे, तर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन्सकडे 197 सदस्य आहेत.
देशावर निवडणुकी लादण्याचा कट डेमॉक्रेट्सने रचला आहे. कट्टर डेमॉक्रेट्सने काल केलेले मतदान म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे. पण, मी तुम्हाला सांगतो की, रिपब्लिकन्स शक्तिशाली आहेत. आतापर्यंतचा हा सर्वाधिक शक्तिशाली आणि एकत्रित आलेल्या सदस्यांचा पक्ष आहे, असे त्यांनी शुक्रवारी मिसिसिपी येथील ट्युपेलो येथे कीप अमेरिका ग्रेट या रॅलीत संबोधित करताना सांगितले.
आतापर्यंत अँड्रयू जॉन्सन आणि बिल क्लिन्टन या दोन अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात प्रतिनिधी सभागृहाने महाभियोग आणला आहे. मात्र, या दोन्हीही अध्यक्षांना सिनेटने दोषी ठरवले नव्हते. त्यामुळे महाभियोगाच्या माध्यमातून आतापर्यंत कोणत्याही राष्ट्राध्यक्षाला त्याच्या पदावरून दूर सारण्यात आलेले नाही.
शंभर सिनेटमध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाकडे 53 सदस्यांसह बहुमत आहे आणि डेमॉक्रेट्सकडे 47 जागा आहेत. अमेरिकन कॉंग्रेसची सध्याची रचना पाहता, महाभियोग प्रक्रिया डेमॉक्रेट्सचे नियंत्रण असलेल्या सभागृहाद्वारे होईल आणि मात्र सर्वात जुना पक्ष असलेल्या रिपब्लिकन्सचे नियंत्रण असलेल्या सिनेटमध्ये हा प्रस्ताव पारित होण्याची शक्यता अजिबात नाही.