दिल्ली – भाजपचे खासदार ब्रिजभुषण शरण सिंह यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला असून त्यांच्यावरील कारवाईसाठी अनेक कुस्तीपटू दिल्लीत आंदोलन करत आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी अटकेची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय आरोपांच्या चौकशीचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी करत रविवारपासून आघाडीचे कुस्तीगीर आंदोलन करत आहेत.
याआधी देखील या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. मात्र यावर कोणतीच कारवाई न झाल्याने विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिका या कुस्तीगिरांसह अनेकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. मात्र यावर भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) अध्यक्ष पीटी उषा यांनी आंदोलनकर्त्यांना खडेबोल सुनावले आहे.
‘‘कुस्तीगिरांनी आमच्याकडे येण्याऐवजी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करणे हे बेशिस्त वागणुकीचे लक्षण आहे. त्यांनी देखरेख समितीचा चौकशी अहवाल समोर येण्याची वाट पाहणे गरजेचे होते. त्यांनी उचललेले पाऊल योग्य नाही. लैंगिक शोषणाच्या तक्रारींसाठी ‘आयओए’ची समिती आणि खेळाडूंचा आयोग आहे. त्यामुळे कुस्तीगिरांनी रस्त्यावर उतरण्यापेक्षा आमच्याकडे येणे आवश्यक होते. हे केवळ कुस्तीपटूंसाठीच नव्हे तर खेळासाठीही चांगले नाही, त्यांना काही शिस्तही असली पाहिजे. कुस्तीगिरांच्या कृतीमुळे भारताची प्रतिमा खराब झाली आहे,’’ अशी प्रतिक्रिया उषा यांनी गुरुवारी दिली.
Indian Olympic Association (IOA) is having a committee for sexual harassment, instead of going to the streets they (protesting wrestlers) could have come to us earlier but they didn’t come to IOA. It isn’t good for Sports not only for wrestlers, they should also have some… pic.twitter.com/EaeHQOE4rI
— ANI (@ANI) April 27, 2023
मात्र, पीटी उषा यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. बजरंग पुनिया याने देखील पीटी उषा यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘आयओए’ अध्यक्ष पीटी उषा यांच्याकडून आम्हाला अशा प्रकारच्या विधानाची अपेक्षा नव्हती. त्या माजी खेळाडू आहेत. स्वत: महिला आहेत. त्यामुळे त्या आम्हाला समर्थन आणि पाठिंबा देतील अशी आम्हाला अपेक्षा होती,” असे बजरंग पुनिया म्हणाला.