कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असताना दुसरीकडे कोरोनाग्रस्तांच्या बंद घरात चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी गावात ही घटना घडली आहे. कोरोनाग्रस्तांच्या घरात चोरी झाल्याने पोलिसांना थेट पंचनामा करणे अडचणीचे झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हलकर्णी येथील एकाच कुटुंबातील सहाजणांना कोरोना झाल्याने त्यांना गडहिंग्लज कोविड केंद्रात दाखल केले आहे. गेली चार दिवस त्यांचे घर बंद आहे. याचाच फायदा घेत चोरट्यांनी त्यांचे घर फोडून डल्ला मारल्याने एकच खळबळ उडाली आहे.गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी येथील बसस्टँड चौकात राहणार्या व्यक्तीला तेरणीतील बाधित नातेवाईकांशी संपर्क आल्याने कोरोनाची बाधा झाली.
यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने घरातील 10 सदस्यांना गडहिंग्लज कोविड केंद्रात दाखल केले आहे. यापैकी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर इतरांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले आहे. त्यामुळे त्यांचे घर कुलूपबंद केले आहे. याचाच फायदा घेत चोरट्यांनी घर फोडले. ही बाब सकाळी शेजार्यांच्या लक्षात आली.
पोलिसांनी या ठिकाणी पाहणी केली. मात्र सर्वच सदस्य कोरोना केंद्रात असल्याने नेमका किती ऐवज गेला, याची माहिती मिळाली नाही. कोरोनाग्रस्तांच्या घरात चोरी झाल्याने पोलिसांना थेट पंचनामा करणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे नेमका कितीचा ऐवज गेला, याची माहितीही मिळू शकली नाही.