येरवडा (प्रतिनिधी) : कंटेन्मेंट झोनमध्ये बंदोबस्त करीत आहात,या काळात स्वतःची काळजी घ्या, सॅनिटायझर,मास्कचा वापर करा, आवश्यकता असल्यास तात्काळ तपासणी करून योग्य ती औषधे देखील घ्या, स्वतः बरोबर कुटुंबाचीही काळजी घ्या अशी आपुलकीने विचारपूस गृहमंत्री देशमुख यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची केली. स्वतः गृहमंत्र्यांनी चौकशी केल्यामुळे हे पोलिस कर्मचारी भारावून गेले होते.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येरवडा कंटेनमेंट झोन या ठिकाणी बंदोबस्त करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याशी रविवारी संवाद साधला. गृहमंत्री देशमुख रविवारी पुणे भेटीवर आले असता, त्यांनी येरवडा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह येथील करोना तपासणी कक्षाची पाहणी केली. यावेळी बंदोबस्तावर हजर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधत त्यांचे विचारपूस देखील केली.
येरवडा पोलीस स्टेशन येथील पोलीस शिपाई गोविंद कोळेकर, पोलीस मुख्यालय येथील पोलीस शिपाई तेजस कुंभार व महिला पोलीस निशा शिंदे यांची गृहमंत्री देशमुख यांनी आवर्जून विचारपूस केली. राज्याचे गृहमंत्री रस्त्यावर उभ्या असणाऱ्या पोलिसांची स्वतः विचारपूस करतात हे पाहून उपस्थित सर्वांनाच आश्चर्य वाटले.
यावेळी आमदार सुनील टिंगरे, माजी उपमहापौर व नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक अविनाश साळवे,पोलीस आयुक्त के.व्यंकटेशम अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल, अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चौधरी, लुंकड रियालिटीचे अमित लुंकड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख,गुन्हे निरीक्षक अजय वाघमारे उपस्थित होते.
यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी करोना तपासणी सेंटरची पाहणी केली. पुणे शहरासह येरवडा व परिसरात कोरोना आजाराचे बाबतीत पुणे महापालिका व पोलिस दलाने आवश्यक ती सर्व खबरदारी व उपाययोजना करण्याचे आदेश गृहमंत्री देशमुख यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.