वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली-आव्हाळवाडी रोडच्या रोज वूड पार्क परिसरातील सोसायटीमध्ये एका ६० वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे. सात दिवसापूर्वीच वृद्ध कुटुंबासह सोलापूरहून वाघोली येथे दाखल झाले होते. बाहेर गावावरून आल्याने त्यांनी स्वतःला क्वारंटाईन केले होते. वृद्धाला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर कोरोना टेस्ट केली असता रिपोर्ट पॉजिटीव्ह आला. त्यांना उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घर व परिसरामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी करण्यात आली असून वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.
वाघोलीमध्ये आत्तापर्यंत एकूण १७ कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. यापैकी १३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण ४ रुग्ण अॅकटीव असून यापैकी एकजण लवकरच घरी परतणार आहे.