शिवाजी मार्केट यार्डातील फूल बाजारात फुलांची आवक वाढली
पुणे – नवरात्रोत्सव सुरू झाल्यानंतर हार तसेच पूजेसाठी शेवंतीच्या फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. एरवी बाजारात प्रतिकिलो 30 ते 40 रुपये भाव असणाऱ्या शेवंतीला उच्चांकी भाव मिळाला आहे. प्रतवारीनुसार शेवंतीला 150 ते 170 रुपये असा भाव मिळाला आहे.
नवरात्रोत्सव सुरू झाल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फूल बाजारात फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. झेंडू, शेवंती, गुलाब तसेच अन्य फुलांची मोठी आवक होत आहे. दसरा येत्या मंगळवारी (दि. 8) असून दसऱ्यासाठी खास झेंडूच्या फुलांची आवक सुरू झाली आहे, अशी माहिती फूल बाजारातील प्रमुख व्यापारी सागर भोसले यांनी दिली.
ते म्हणाले, की झेंडूची आवक चांगली होत असली तरी अद्याप अपेक्षेएवढे भाव मिळाले नाहीत. नवरात्रोत्सवापूर्वी पुणे तसेच लगतच्या जिल्ह्यांमध्ये झालेल्या पावसामुळे फुले भिजलेली आहेत. त्यामुळे कोरड्या फुलांना चांगली मागणी आहे. अन्य फुलांच्या तुलनेत शेवंतीला चांगला भाव मिळाला आहे.
झेडूंची आवक वाढेल
सोलापूर भाग तसेच पुणे जिल्ह्यातील यवत भागात झालेल्या पावसामुळे फुले भिजली आहेत. शुक्रवारी बाजारात ओल्या फुलांची आवक झाली. त्यामुळे प्रतवारीवर परिणाम झाला. साध्या झेंडूचा वापर तोरणांसाठी केला जातो. कोलकात्ता झेंडू आकाराने लहान असून त्याचा वापर पूजेसाठी केला जातो. पुणे, सोलापूर, सातारा भागातून पुढील तीन दिवसांत झेंडूची आवक वाढेल, असे फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी दिली.