देशभरातील करोनाबाधितांची संख्या अडीच लाखाजवळ
नवी दिल्ली: देशात आज सलग पाचव्या दिवशी सर्वाधिक करोना बाधितांची नोंद झाली. आज 9,971 नवीन रुग्णांची नोंद होऊन देशातील करोनाबाधितांची संख्या 2 लाख 46 हजाराच्या पुढे गेली. तर देशभरातील मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या 7 हजारांच्या जवळ पोहोचली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. शनिवार सकाळपासून 24 तासांमध्ये देशभरात 287 नवीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी रात्री उशीरापर्यंत करोना बाधितांच्या संख्येच्या क्रमवारीमध्ये भारताने स्पेनला मागे टाकले होते. आता या क्रमवारीमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे. आता केवळ अमेरिका, ब्राझिल, रशिया आणि ब्रिटन हे चारच देश भारताच्या पुढे आहेत.
भारतात कोविड-19 च्या सक्रिय रुग्णांची संख्या 1,20,406 इतकी आहे, तर गेल्या 24 तासात 5,220 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. याचाच अर्थ करोनामुक्त होण्याचे प्रमाण 48.37 टक्के इतके आहे, असे आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. देशातील करोनाबाधितांच्या रुग्णांच्या संख्येमध्ये विदेशी रुग्णांचाही समावेश आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने करोना चाचण्यांची क्षमता वाढवली असून देशभरात 531 सरकारी प्रयोगशाळांबरोबरच 228 खासगी प्रयोगशाळांमधूनही करोनाच्या संसर्गाची चाचणी केली जात आहे. देशभरात एकूण 759 प्रयोगशाळांमध्ये ही चाचणी केली जात आहे. गेल्या 24 तासांत सुमारे 1,42,069 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली, आतापर्यंत एकूण 46,66,386 इतक्या नमुन्यांची चाचणी केली गेली आहे.
एक लाख लोकसंख्येमागे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जागतिक पातळीवरील सरासरी 5.17 च्या कमी म्हणजे 0.49 इतके आहे. जगात ज्या देशांमध्ये लॉकडाऊन शिथिल केले गेले आहे अशा जर्मनी (10.35), इटली (55.78), ब्रिटन (59.62) आणि स्पेन (58.06) या देशांपेक्षा हा दर खूपच कमी आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या हवाल्याने आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
तसेच जागतिक पातळीवर प्रति लाख लोकसंख्येमागील करोनाबाधितांचे सरासरी प्रमाण 87.74 आहे. त्यातुलनेत भारतातील प्रमाण अत्यल्प (17.32) आहे. त्यातुलनेत जर्मनी (219.93), इटली (387.99), ब्रिटन (419.54) आणि स्पेन (515.61) या देशांमधील करोनाबाधितांचे प्रमाण अधिक आहे.
शनिवारपासून देशात मिळालेल्या 287 रुग्णांपैकी महाराष्ट्रात 120, दिल्लीत 55, गुजरातमध्ये 29, तामिळनाडू 19, पश्चिम बंगाल 17, मध्यप्रदेश 15, राजस्थान 13, तेलंगण 10, जम्मू काश्मीर 3, कर्नाटक, पंजाब आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी 2 आणि केरळ आणि बिहारमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.