पाहता पाहता वर्ष सरले आणि वर्षाखेर आला. डिसेंबर महिना उजाडला की वर्षभराचे सिंहावलोकन सुरू होते. मागोवा घेतला जातो. बॉलीवूडसाठी 2019 हे वर्ष तसे पाहता अत्यंत चांगले ठरले आहे. सरत्या वर्षांत अनेक चित्रपटांनी तिकीट खिडकीवर दमदार कमाई केली. त्याचबरोबर अनेक कलाकारांच्या कारकिर्दीला नवे आयामही मिळाले. विशेष म्हणजे अक्षयकुमार, आमीर खान, सलमान खान या दरवर्षी यशाच्या शिखरावर राहणाऱ्या कलाकारांऐवजी काही नव्या ताऱ्यांनी यंदा बाजी मारली.
शाहीद कपूरने खूप कमी वयात सिनेसृष्टीत पदार्पण केले. प्रमुख अभिनेता म्हणून त्याला काही चांगले चित्रपट मिळाले आणि या चित्रपटांनी तिकिट बारीवर चांगले यशही मिळवले; पण तरीही त्याला एका दमदार, सशक्त चित्रपटाची गरज होती. 2019 मध्ये ती गरज “कबीर सिंह’ने पूर्ण केली. अर्जुन रेड्डी निर्मित या रिमेकपटाने यंदाच्या वर्षी सर्वाधिक कमाई करणारा दुसऱ्या क्रमांकाचा चित्रपट म्हणून नाव नोंदवले आहे. तिकीट खिडकीवर या चित्रपटाने 278 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या कलेक्शनचा विचार केला तर शाहीदही 2019 चा सुपरस्टार ठरला असे म्हटल्यास गैर ठरणार नाही.
बॉलीवूडचा सध्याचा आघाडीचा आणि लाडका नायक बनलेल्या विकी कौशलच्या “उरी’ने 240 कोटींचा टप्पा पार केला. या चित्रपटाने विकीला आघाडीच्या नायकांच्या पंक्तीत नेऊन बसवले. त्याला राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आले. तिकिट खिडकीवरील कमाईच्या बाबतीत विकी दुसऱ्या क्रमांकाचा अभिनेता ठरला.
हृतिक रोशनच्या “वॉर’ चित्रपटाने 318 कोटींची कमाई करुन सरत्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून नाव कमावले. हृतिकच्या “सुपर 30′ या चित्रपटाने 146 कोटींची कमाई केली. सरासरी कमाईचा विचार करता हृतिक सरत्या वर्षात तिसऱ्या स्थानावर राहिला. अक्षयकुमारचे यंदाच्या वर्षी तीन चित्रपट प्रदर्शित झाले. यातील “केसरी’ने 153 कोटी, मिशन मंगल’ने 200 कोटी आणि हाऊसफुल 4 ने 206 कोटी कमावले. आता 27 डिसेंबरला अक्षयचा “गुडन्यूज’ प्रदर्शित होत आहे.