ग्राहकांच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होणार
पुणे – स्टेट बॅंकेने परवा आपल्या व्याजदरात कपात जाहीर केल्यानंतर इतर बॅंकांही आपल्या कर्जावरील व्याजदरात कपात जाहीर करीत आहेत. युको बॅंक, सिंडिकेट बॅंक आणि युनियन बॅंक ऑफ इंडियाने व्याजदरात कपात केली आहे.
युको बॅंकेने सर्व कालावधीच्या कर्जांसाठीच्या जुन्या पद्धतीच्या म्हणजे “एमसीएलआर’ दरामध्ये 0.10 टक्क्यापर्यंत कपात केली आहे. या बॅंकेचा एक वर्षासाठीचा “एमसीएलआर’ दर आता 8.40 टक्क्यावरून 8.30 टक्के करण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
युनियन बॅंक ऑफ इंडियाने आपल्या “एमसीएलआर’ दरामध्ये 0.05 ते 0.10 टक्क्यांची कपात केली आहे. या बॅंकेचा एक वर्षासाठीचा “एमसीएलआर’ 8.20 टक्के इतका झाला आहे. बॅंकेने आपल्या सर्व कालावधीच्या “एमसीएलआर’मध्ये कपात केली असून निर्णयाची अंमलबजावणी 11 डिसेंबरपासून सुरू झाली.