तब्बल 61 संचालक अपात्र : विविध कार्यकारी सोसायट्यांची झाडाझडती
10 गुंठ्यापेक्षा कमी जमीन असणाऱ्या 2696 सभासदांचे सदस्यत्व रद्द
कामशेत – विविध कार्यकारी सोसायटीचे बोगस, मयत आणि अपूर्ण शेअर रक्कम व 10 गुंठेपेक्षा कमी जमीन असे 23 हजार 934 मतदार यादीतून वगळण्यात आले आहेत. एवढंच नाही तर मावळातील सहाय्यक निबंधक कार्यालयाने विकास सोसायट्यांची चौकशी करून 61 विकास सोसायट्यांच्या संचालकांना अपात्र ठरविले आहे. विशेष म्हणजे दहा गुंठ्यापेक्षा कमी जमीन असणाऱ्या एकूण 2696 सभासदांना विकास सोसायट्यांमधून सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे, याचा परिणाम होऊन 28 संचालकांना त्यांच्या संचालक सोडावे लागले आहे. अशा एकूण 89 संचालकांची हकालपट्टी करण्यात आल्याने तालुक्यातील विकास सोसायट्यांमध्ये मोठे बदल घडण्यास सुरवात झाली आहे.
विकास सोसायटीमार्फत ग्रामीण भागाच्या तळागाळातील सर्व शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जात असल्याने ग्रामीण विकासात विकास सोसायटीस महत्वाचे स्थान आहे, विकास सोसायट्यामार्फत शेतकऱ्यांना पीक कर्जापासून शेती संदर्भात येणाऱ्या सर्व प्रकारच्या कर्जाचा पुरवठा केला जातो. यामुळे ग्रामीण भागातील सर्व शेतकरी हे विकास सोसायट्यांना जोडलेले असतात. यामुळे सेवा सोसायटीवर ज्यांचे वर्चस्व त्यांचे राजकारणात प्राबल्य हे समीकरण कालांतराने रूढ झाल्यावर विकास सोसायट्या या राजकारणाचे अड्डे बनल्या, गट-तट आणि राजकारणामुळे या संस्था मूळ उद्देशापासून भरकटू लागल्या असून, त्यामुळे सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अपेक्षित विकास साधने शक्य होत नाही.
मावळ तालुक्यात सध्या 55 विकास सोसायट्या असून, सहायक निबंधक (सहकारी संस्था वडगाव मावळ) यांनी गेली वर्षभर सतत या विकास सोसायट्यांची चौकशी करून वर्षानुवर्ष बेकायदेशीररित्या सोसायट्या ताब्यात ठेवणाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. थकबाकीदार व्यक्तींना प्राथमिक विकास सोसायटीच्या संचालक पदावर राहता येत नाही. त्यामुळे तालुक्यातील 61 थकबाकीदार संचालकांना थकबाकी मुले अपात्र ठरविण्यात आलेले आहे,
तसेच 10 गुंठ्ठे पेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या व्यक्तींना देखील विकास सोसायटीचे सभासद होता येत नसताना देखील वर्षानुवर्ष एकूण 2696 बेकायदेशीर सभासद होते. त्यांना देखील विकास संस्थामधून कमी करण्यात आले आहे. तसेच 4807 मयत सभासदांची नवे देखील कमी करण्यात आलेली आहेत, केवळ निवडणुकीत मतदानासाठी सभासद झालेल्या मात्र संस्थेशी कोणतेही व्यवहार न करणारे बारा हजार पाचशे सभासदांना अकार्यशील घोषित केल्यामुळे त्यांना निवडणूक प्रक्रियेत भाग घेता येणार नाही.
याचा परिणाम सन 2020 मध्ये होणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीवर तसेच मावळातील 31 विकास सोसायट्यांच्या निवडणुकांवर होणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.
28 सोसायट्या ठरल्या अपात्र…
10 गुंठ्यांपेक्षा कमी जमीन असलेल्या अपात्र संचालक : (गावे आणि कंसात अपात्र संचालक संख्या) : करंजगाव (2), खडकाळा (3), लोणावळा (4), ताजे (1), पाथरगाव (1), वडगाव (4), कुसगाव बुद्रुक (1), टाकवे बुद्रुक (3), पीर साईबाबा (1), सांगीसे (1), इंदोरी (2), पुसाने (3), सुदुंबरे (2).
विविध कार्यकारी सोसायट्यातील बेकायदेशीर संचालक व सभासद यांना सोसायट्यांच्या कारभारातून कमी केल्याने सोसायट्यांचा कारभार पारदर्शी होण्यास मदत होईल. तसेच तोट्यात गेलेल्या संस्थाना नफ्यात येण्यास मदत होईल आणि देशात पहिल्यांदाच सभासद असणाऱ्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यास पुढाकार घेतला असून, यामुळे शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणे सुलभ होणार आहे.
– विठ्ठल सूर्यवंशी, सहाय्यक निबंधक, मावळ.