माजी कृषिमंत्री शरद पवार ः चौफुल्यात राष्ट्रीय वयोश्री योजना उपक्रम
केडगाव – समाजातील दिव्यांग लोकांना सन्मानाने जगता आले पाहिजे तरच त्यांचे जीवन सुखी आणि समाधानी होईल, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून दौंड तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना आणि ज्येष्ठ नागरिकांना विविध उपकरणे वाटप करण्यात आली. चौफुला (ता. दौंड) येथील दत्त गार्डन मंगल कार्यालयात आज (दि. 16) पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार रमेश थोरात, तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, पंचायत समितीच्या सभापती आशा शितोळे, उपसभापती नितीन दोरगे बाजार समितीचे सभापती दिलीप हंडाळ, शहर अध्यक्ष गुरमुख नारंग आणि पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
शरद पवार पुढे म्हणाले की, शाररिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या लोकांसाठी काम करून सर्वांच्या हिताची जपणूक करण्याचे कार्य सरकारने करायला हवे. शंभर टक्के विकासकाम झाली नाही तरी चालेल; परंतु दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगता आले पाहिजे. सध्या महाराष्ट्र राज्यात धोरणाने काम करणारे सरकार असल्याने ते सर्व लोकांचा विचार करतील, याबाबत शंका नाही.
यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, राज्यात साहेबांमुळे होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं झालं. मला सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी देऊन उपेक्षित लोकांची सेवा करता येणार असल्याने मी पवारसाहेबांचं ऋण व्यक्त करतो. यावेळी आप्पासो पवार आणि रमेश थोरात यांचीही भाषणे झाली.
वयोश्री योजना केंद्र सरकारची योजना असून बारामती लोकसभा मतदार संघात आतापर्यंत चौदा हजार लोकांना याचा लाभ मिळाला आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आतापर्यंत 41 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. ही योजना यशस्वी करण्यात आपण वाराणसी मतदारसंघाच्या पुढे आहोत, याचा अभिमान आहे, तसेच याची नोंद गिनिज बुकात झाली आहे.
सुप्रिया सुळे, खासदार,