आक्षेपार्ह विधानाबाबत संजय राऊत यांचा निषेध, मोती चौकात भाजपचे “जोडे मारो’ आंदोलन
सातारा – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ गुरूवारी सातारा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. राजघराण्याच्या समर्थनार्थ राजे समर्थक आक्रमकपणे रस्त्यावर उतरले. संजय राऊत व जितेंद्र आव्हाड यांचे फलक गाढवाच्या गळ्यात अडकवून त्यांची ताशाच्या गजरात धिंड काढण्यात आली. भाजपच्या वतीने मोती चौकात संजय राऊत यांच्या पुतळ्याला “जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.
सातारा “बंद’चा फटका शाळा व महाविद्यालयांना तसेच सकाळच्या तातडीच्या सेवांना बसला. दळणवळण व व्यवहार पूर्णतः ठप्प झाले. संजय राऊत यांनी एका जाहीर कार्यक्रमात साताऱ्याच्या राजघराण्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे शहरात मोठे पडसाद उमटले. राजे समर्थकांनी आवाहन केलेल्या सातारा “बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
व्यापारी व व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपले व्यवसाय बंद ठेवले. शाळा व महाविद्यालयांना “बंद’मुळे सुट्टी मिळाली. दूध व तत्सम तातडीच्या सेवा कोलमडल्या. तर शहर बससेवा व रिक्षा बंद झाल्याने शाळेत पोहचलेल्या विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले. पालकांना शाळेत जाऊन पाल्यांना घरी आणावे लागले.
पेट्रोल पंपांची सेवा बंद झाल्याने वाहन चालकांचे हाल झाले तर सकाळी हॉटेल्स व दुकाने बंद ठेवण्यात आल्याने दळणवळण व व्यवहार शंभर टक्के बंद राहिले. साताऱ्यात सकाळी दहा वाजता राजे समर्थकांनी गोलबागेतील प्रतापसिंह महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निषेध रॅलीला सुरवात केली. यावेळी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, निशांत पाटील, प्रशांत अहेरराव, संदीप भाऊ शिंदे, संग्राम बर्गे, अविनाश कदम, हेमांगी जोशी, राजू गोडसे, राजू भोसले, जयेंद्र चव्हाण, यशोधन नारकर, मनोज शेंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष विकास गोसावी, धनंजय जांभळे, प्राची शहाणे, जयदीप ठुसे, नीलेश नलावडे आदी उपस्थित होते.
संजय राऊत यांच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. राजे समर्थक राजवाडा- मोती चौक- देवी चौक- कमानी हौद- शाहू चौक मार्गे पोवई नाक्यावर पोहचले. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून समर्थकांनी संजय राऊत व जितेंद्र आव्हाड यांच्या नावाचे फलक गाढवाच्या गळ्यात अडकवून ताशा वाजवत त्यांची धिंड काढण्यात आली.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोती चौकात सकाळी अकरा वाजता स्वतंत्र आंदोलन केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांच्या प्रतिमेला “जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. विकास गोसावी, धनंजय जांभळे, प्राची शहाणे, जयदीप ठुसे, नीलेश नलावडे आदींनी निषेधाच्या घोषणा देत “जोडे मारो’ आंदोलनात सहभाग घेतला.
उदयनराजे समर्थकांची साताऱ्यात रॅली
संजय राऊत यांनी उदयनराजेंबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी प्रारंभी पोवई नाका येथे मावळ्यांनी यावे, असा निरोप प्रथम देण्यात आला होता. नंतर मात्र राजवाडा येथे निषेध करण्याचे निश्चित करण्यात आल्यानंतर उदयनराजे भोसले समर्थक पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून दुचाकीची रॅली काढून गटागटाने घोषणा देत राजवाडा येथील गांधी मैदानाकडे जात होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या रॅली गांधी मैदानाकडे कूच करत होत्या.
बॉम्बे रेस्टॉरंट, संगमनगर येथे कडकडीत बंद
उदयनराजे भोसले प्रेमी समर्थकांनी पुकारलेल्या सातारा “बंद’ला बॉम्बे रेस्टॉरंट, संगमनगर, कृष्णानगर, वाढेफाटा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रुग्णालय, मेडिकल या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापाऱ्यांनी “बंद’मध्ये सहभाग घेतला होता. रिक्षाचालकांनीही रिक्षा रस्त्यावर आणल्या नव्हत्या. साताऱ्यात “बंद’ असल्याची माहिती मिळताच ग्रामीण भागातील अनेकांनी सातारा शहरात येण्याचे टाळले. रस्त्यावर दुपारपर्यंत पूर्ण शुकशुकाट दिसून येत होता.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
सातारा “बंद’ची हाक अचानक दिल्यामुळे पोलिसांनी सकाळी आठ वाजल्यापासूनच सातारा शहरामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. पोवई नाका, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे निवासस्थान, नगरपालिका परिसर, बस स्थानक, गांधी मैदान, बॉम्बे रेस्टॉरंट परिसर येथे पोलीस तैनात करण्यात आले होते. राजवाडा ते पोवई नाका या दरम्यान शंभर पोलीसांची कुमक तैनात करण्यात आली होती