बिजिंग : कोरोना विषाणूंच्या कहर सुरू असतातनाच आता चीनला पुन्हा बर्ड फ्लूच्या विषाणूंनी हैराण केले आहे. त्यामुळे या संकटाला कसे सामोरे जातो ते पहावे लागणार आहे. चिनच्या कृषीमंत्र्यांनीच ही माहिती दिली आहे.
बर्ड फ्ल्यूसाठी कारणीभूत ठरणारा एच5एन1 हा विषाणू हुबेई प्रांतात आढळला आहे. याच प्रांतात कोरोना विषाणूंनी धुमाकूळ घातला आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, शाओयांग या गावात या विषाणूच्या प्रादुर्भावाने साडेचार हजार कोंबड्या मरण पावल्या आहेत. त्यानंतर साथ प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत.
हा फ्ल्यू पसरू नये म्हणून तातडीने उपाय योजना करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप मानव या आजाराने बाधीत झाल्याचे वृत्त नाही. भारताने चीनला जाण्यासाठी दिल्या जाणाऱ्या ई व्हिसाला भारताने मनाई केली आहे.
दरम्यान, जगभर धडकी भरवणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये बळी पडलेल्यांची संख्या 304 वर पोहोचली आहे. हुबेई प्रांतात रविवारी एका दिवासंत 45 जण या विषाणूंच्या बाधेमुळे मरण पावले.
चीनच्या आरोग्य विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, हुबेई प्रांतात कोरोना विषाणू बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एक हजार 921 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे चीनमधील बाधीतांची संख्या 13 हजार 700 वर पोहोचली आहे. हुबेई प्रांताची राजधानी वुहानमध्ये हा विषाणू डिसेंबर महिन्यात आढळला होता.
चीनी नव वर्ष दिनाच्या सुटीसाठी जगभरातून आलेल्या नागरिकांमुळे हा विषाणू जगाची समस्या बनला आहे. चीनने स्वत:ला जगापासून तोडले आहेच. पण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी चीनला जाण्यास नागरिकांना बंदी घातली आहे. सुमारे 20 देशांत या विषाणूंची बाधा पोहोचली आहे.