बुर्केगाव येथील घटना ; वुमन्स हेल्पलाइन फौंडेशनची लोणीकंद पोलिसांत फिर्याद
वाघोली-बुर्केगाव (ता. हवेली) येथे अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याप्रकरणी सहाजण व इतर नातेवाईकांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात बाल विवाह प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती व वुमन्स हेल्पलाइन फौंडेशनच्या महिलांनी बालविवाहाचा प्रकार उघडकीस आणून पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, बीड येथील 15 वर्षे वयाच्या मुलीचा विवाह बुर्केगाव येथील एका 24 वर्षे वयाच्या मुलाबरोबर शुक्रवारी होणार असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव यांना कळली. त्यांनी वुमन हेल्पलाइन फौंडेशनच्या अध्यक्षा नीता परदेशी यांना माहिती सांगितली. परदेशी यांनी मोनिका पिसाळ, संकल्प वाघमारे, कृष्णा कुंदनांमी, स्वाती कदम यांच्यासह आळंदी येथे या विवाहाचा शोध घेतला. मात्र तो विवाह बुर्केगाव येथे होणार असल्याचे कळाल्यानंतर त्यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाला याबाबत कळविले. लोणीकंद पोलीस व परदेशी बुर्केगाव येथे सायंकाळी पोहचल्या. तोपर्यंत विवाह संपन्न झाला होता.
अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्यामुळे परदेशी यांनी या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी मुलगा, त्याची आई, भाऊ, मुलीचे आई, वडील, मामा व इतर नातेवाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी बीडमध्ये नववी इयत्तेत शिकत होती. तिला एका सामाजिक संस्थेत दाखल करण्यात आले आहे.