कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत शहरानजीकच्या कुळधरण रोडवरील जगदंबा फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे अडीच लाखांचे इलेक्ट्रॉनिक्स साहित्य लंपास केले होते. गुरुवारी (दि.4) रात्री ही घटना घडली होती. कर्जत पोलिसांनी सापळा लावून यातील दोन आरोपींना बारडगाव येथून अटक केली आहे.
दुकानाचा पत्रा उचकटून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला होता. दुकानातील सामानाची उचकापाचक करून सीसीटीव्ही संचाचीही चोरट्यांनी मोडतोड करून टेलिव्हिजन संच लंपास केले होते. याप्रकरणी मालक राहुल गांगर्डे यांनी कर्जत पोलिस स्टेशनला फिर्याद दिली होती. गांगर्डे यांनी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून दिले होते.
याप्रकरणी पोलिसांनी अक्षय ताराचंद उर्फ यादव पवार (रा. बारडगाव दगडी) व अक्षय महेंद्र काळे (रा.बारडगाव सुद्रिक) यांना अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक टेलिव्हिजन संच हस्तगत केला आहे. पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरु होता.गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्जत पोलिसांना आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी पोलिसांची पथके रवाना केली होती. दोन आरोपी मिळून आल्याने गुन्ह्याचा पूर्ण तपास लागण्यास मदत होणार आहे.