मनमोहन सिंग यांचे आर्थिक विश्‍लेषण सरकारला नको

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे स्पष्टिकरण

नवी दिल्ली:  माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे अर्थविषयक विश्‍लेषण सरकारने स्वीकारलेले नाही. मनमोहन सिंग यांचे विश्‍लेषण आम्हाला नको आहे. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात भारत हा जगभरातील 11 व्या क्रमांकाची अर्थसत्ता होता. मात्र आता देश जगातील आघाडीच्या पाच अर्थसत्तांपैकी एक आहे आणि आम्ही तिसऱ्या क्रमांकाच्या दिशेने वाटचाल करत आहोत, असे आज केंद्र सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

गेल्या आठवड्यात मनमोहन सिंग यांनी देशाच्या आर्थिक स्थितीवरून केंद्र सरकारवर टीका केली होती. देशाची आर्थिक स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे ते म्हणाले होते. तसेच सरकारने सूडाचे राजकारण बाजूला ठेवून सर्वसामान्यांचा आवाज ऐकावा. तसेच मनुष्य निर्मित आपत्तीत अडकलेल्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी विचार करणाऱ्यांचे ऐकावे, असे आवाहन मनमोहन सिंग यंनी केले होते. त्या टीकेला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज प्रत्युत्तर दिले. सिंग यांनी अर्थव्यवस्थेबाबत केलेल्या टिप्पण्यांसंदर्भात एका प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आर्थिक वाढ पाच टक्के इतक्‍या सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरत आहे. याच संदर्भाने जावडेकर पुढे म्हणाले की, सरकार अर्थव्यवस्थेचा तुकड्या-तुकड्याच्या दृष्टीने पाहत नाही आणि त्याबाबत सरकारचे व्यापक मत आहे. केंद्रात सध्या एक जबाबदार सरकार आहे, नागरिकांशी संबंधित मुद्‌द्‌यांकडे सरकार लक्ष देत आहे, आणि जीएसटीमध्येही आम्ही ही प्रक्रिया पाहिली आहे. जीएसटी कौन्सिल दर महिन्याला बैठक घेऊन संबंधित निर्णय घेते आणि म्हणूनच लोकानुकूल सरकार असेच काम करते. आम्हीही तसेच काम करत आहोत, असे ते म्हणाले.
गेल्या महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी एनबीएफसी क्षेत्रातील तरलता वाढविण्यासह अनेक आर्थिक उपाययोजनांची घोषणा केली होती.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×