संदीप राक्षे
सातारा – अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे भाजपची जिल्हा कार्यकारिणी नगरविकास आघाडीला बरोबर घेऊन कामाला लागली आहे. गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे गुफ्तगू साधणार असून शहर कार्यकारिणीच्यावतीने गणेश मंडळांना स्मृती चिन्हे देण्यात येणार आहेत. भाजपचे हे गणराय संपर्क अभियान सध्या भलतंच चर्चेत आहे. गाठीभेटी हा संपर्क अभियानाचा हेतू असला तरी लक्ष वेधणे हा दुसरा राजकीय पैलू आहे.
सध्या तरी साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले या अभियानाचे स्टार कॅंपेनर आहेत. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातील संभाव्य आचारसंहिता व त्यानंतर प्रचारासाठी मिळणारा अवघा पंचवीस दिवसांचा कालावधी यामुळे भाजपच्या कोअर टीमने गणपतीतही संपर्क अभियान सुरू ठेवण्याचे निश्चित करून त्याची रूपरेषाही ठरवण्यात आली आहे.
सातारा शहरात नोंदणीकृत 121 व विना नोंदणी 228 गणेश मंडळ आहेत. त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून भाजपच्या कल्याणकारी योजनांची माहिती उमेदवाराकडून नागरिकाना दिली जाणार आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शहर व उपनगरांमधून 23 टक्के मतदान हे शिवेंद्रराजे यांच्या विरोधात झाले होते. शहरातील काही प्रमुख वॉर्डातच आमदारांना विरोध झाल्याचे समोर आले. त्यामुळे नाराजीचा डॅमेज कंट्रोल हा गणरायाच्या निमित्ताने घडणार असून भाजपचे संपर्क अभियान गौरीच्या जेवणानंतर सुरू होणार असल्याचे स्पष्ट होणार आहे. भाजपच्यावतीने सर्व मंडळांना विशेष स्मृती चिन्ह दिले जाणार आहे. स्मृती चिन्हाच्या निमित्ताने मिसळ डिप्लोमसी करणाऱ्या शिवेंद्रराजेंचा थेट जनतेत जाऊन गाठीभेटीचा अजेंडा आहे.
सध्या तरी नगरविकास आघाडीचे अशोक मोने याचे कार्यालय व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचा सुरूची बंगला हेच भाजपचे वॉर रुम आहे. सातारा शहर परिसरात भाजपची पक्ष कार्यालयासाठी 42 गुंठे जागा आहे. विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने पक्ष निधी अदा केला जाईल ही अपेक्षा होती. मात्र मंदीमुळे वित्तीय तूट चार टक्क्यांनी वाढल्याने वित्त विभागाने अनुदान कपातीची कात्री लावली आहे. त्यामुळे भाजपचे राजकारण सध्या तरी शुक्रवार पेठेतून सुरू आहे.
उदयनराजेंच्या प्रवेशाची प्रतीक्षा
खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाचा क्लायमॅक्स प्रचंड ताणला गेला आहे. राजेंचा प्रवेश येत्या 7 सप्टेंबरला दिल्लीत नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या वेळी होणार असल्याची माहिती आहे. मात्र त्यांच्या प्रवेशाची भाजपच्या शहर कार्यकारिणीला अडचण झाली आहे. भाजपमध्ये उदयनराजे यांचा पक्ष प्रवेश होणे आवश्यक होते. म्हणजे भाजपची शहर कार्यकारिणी दोन्ही राजांचे फोटो मोमेंटोवर छापणार होती. मात्र खासदारांच्या तळ्यात मळ्यात कार्यक्रमांमुळे गणेश मंडळाचे शिल्ड वाटप व प्रत्यक्ष संपर्क अभियान हे लांबणीवर पडला आहे.