डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना : पेरणे फाटा येथे बैठक
शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) व पेरणे फाटा (ता. हवेली) येथे 1 जानेवारी रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असतात; परंतु हा अभिवादन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वच जबाबदार यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून आपली जबाबदारी पार पाडावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.
पेरणे फाटा येथे 1 जानेवारी रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारीचा आढावा डॉ. म्हैसेकर यांनी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी भेट देऊन घेतला. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, शिरूरच्या तहसीलदार लैला शेख, हवेलीचे सुनील कोळी, कोरेगाव भीमा विजयरणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, पोलीस, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण विभाग, जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी, अधिकारी, नागरिक उपस्थित होते.
यावेळी म्हैसेकर म्हणाले की, मागील वर्षीच्या नियोजनामध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करुन प्रशासकीय यंत्रणांनी कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत सतर्क राहणे गरजेचे आहे. येणाऱ्या नागरिकांसाठी जादा सुविधा पुरविण्यात याव्यात. आवश्यकतेनुसार इतर यंत्रणांची देखील मदत घेण्यात यावी.
यावेळी जिल्हा अधिकारी नवल राम यांनी महावितरण विभागामार्फत करण्यात येणाऱ्या पथदिवे, हायमास्ट दिवे, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणाऱ्या रस्ते दुरुस्ती, वाहनतळ उभारणी, सीसीटीव्ही कॅमेरा, ड्रोनद्वारे निरीक्षण, पीएमपीएल, एसटी महामंडळाकडून पुरविण्यात येणाऱ्या बसेस, आरोग्य विभागाकडून पुरविण्यात येणाऱ्या रुग्णवाहिका, हॉस्पिटलमधील राखीव खाटा, महिलांकरिता पुरेशी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, अग्निशमन यंत्रणा, नियंत्रण व स्वागत कक्ष आदीबाबत यावेळी माहिती सादर केली.
वढू आणि तुळापूरची पाहणी
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी वढू येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाचे व परिसराची तसेच तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृती स्थळाची पाहणी केली, यावेळी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी कायदा व सुव्यवस्थेचे तसेच हा अभिवादन सोहळा सुरळीतपणे पार पडण्याकरिता पोलीस विभाग सज्ज असल्याचे सांगितले.