नगर – सत्तेचा प्रभाव हा कसा असतो याचा प्रत्यय आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना अनुभवयाला मिळाला. सत्ताधारी महाविकास आघाडीची सत्ता असल्याने या आघाडीचे आमदार व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या दिमतीला अख्खी प्रशासकीय यंत्रणा उभी होती. नुसती उभीच नव्हती तर राबतही होती व ताटकळत थांबलेलीही होती.
आज सायंकाळी रोहित पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक बोलविली.मुळात एका आमदाराला अशी सर्व विभागाच्या विभागप्रमुख असलेल्या अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्याचा अधिकार आहे काय,असा मुद्दा आहे.
अन् विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांपासून सर्व विभागाचे अधिकारी पवार यांच्या दिमतीला ताटकळत हजर होते.एरवी आमदार-खासदाराला ताटकळत ठेवणारे हे अधिकारी आज पवार यांची बडदास्त ठेवण्यात मग्न होते. याची जोरदार चर्चा जिल्हाधिकारी वर्तुळात सुरु होती.