पिंपळे गुरव -सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. घरात गर्मीने नागरिक व लहान मुले हैराण झाली आहेत. त्यात अघोषित भारनियमन यामुळे शहरवासीय पूर्णतः त्रस्त आहेत. त्यामुळे पिंपळे गुरव परिसरातील नागरिक व लहान मुले सकाळी व सायंकाळी उद्यान, गार्डन यामध्ये गर्दी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे पिंपळे गुरव परिसरातील उद्याने अक्षरशः बालचमुंनी फुलून गेली आहेत.
करोना महामारीमुळे मागील दोन वर्षे उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, गार्डन आदी मनोरंजनाची व फिरण्याची ठिकाणे बंद होती. परंतु करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने सर्वच ठिकाणचे निर्बंध हटविल्याने शहरातील उद्याने व सार्वजनिक ठिकाणे खुली झाली आहेत. त्यामुळे घरात कोंडून असलेल्या बालचमुंसाठी मोकळे रान झाले आहे. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरात देखील गर्मीने नागरिक व मुले हैराण झाली आहेत. त्यामुळे सकाळी व सायंकाळी शहरातील उद्याने, गार्डन, पर्यटन केंद्रांमध्ये नागरिक व मुले गर्दी करताना दिसून येत आहेत.
पिंपळे गुरव येथील गार्डनमध्ये मुलांचा राबता आहे. गार्डनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविध रंगीबेरंगी फुलझाडे, डायनासोर व प्रशस्त जागा खेळण्यासाठी असल्यामुळे नागरिक येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. शहरातील विविध परिसरामध्ये बगीच्यांमध्ये लहान मुलांबरोबर वृद्ध व कुटुंबासोबत येऊन बागेमध्ये फेरफटका मारण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. वृक्षांनी भरलेले हे उद्यान फुलांची झाडे तसेच उद्यानामध्ये असणारी हिरवे हिरवे गार गालिच्यांवर मुले खेळताना दिसून येतात. उद्यानात पाण्यावरील रंगीबेरंगी कारंजे मुलांना आकर्षित करत आहेत.
खवय्यांना सुगीचे दिवस
उद्याने सुरू झाल्याने उद्यानाबाहेर व्यवसाय करणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. लहान मुले उद्यानात फिरण्यासाठी व बागडण्यासाठी आल्यानंतर कच्ची दाबेली, पाणीपुरी, भेळ, मन्च्युरीयन, वडापाव, आइस्क्रीम आदी खाद्यसंस्कृती येथे विकसित होऊ लागली आहे. तसेच उद्यानाबाहेर घोड्यांची रपेट करण्यास मुलांना मिळत आहे. तसेच इतर छोट्या मोठ्या गाड्यांमध्ये मुलांना सफर करण्यास मिळत आहे. त्यामुळे राजमाता जिजाऊ उद्यानात नागरिक व मुलांची गर्दी दिसून येत आहे.