संकलन केंद्रही कागदावरच
नदीपात्र, नाल्यांमध्ये राडारोडा टाकण्याचे प्रकार सुरूच
पुणे – बांधकाम, दुरुस्ती, विविध प्रकारची खोदाईची कामे यामुळे निर्माण होणाऱ्या राडारोड्याचे निर्मूलन करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत शहरात राडारोड्याची संकलन केंद्र सुरू करून या राडारोड्यावर वाघोली येथील दगडखाणीत प्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठीच्या प्रकल्पास मान्यता दिल्यानंतर या प्रकल्पाच्या कामाचे कार्यादेशही महापालिकेकडून देण्यात आले आहेत. मात्र, जून महिन्यात सुरू होणे अपेक्षीत असलेला हा प्रकल्प अद्यापही सुरू झालेला नाही. त्यामुळे शहरात नदीपात्र तसेच नाल्यांमध्ये राडारोडा टाकण्याचे प्रकार सुरूच असल्याचे चित्र आहे.
महापालिकेचे विविध विभाग, एमएनजीएल, टेलिफोन कंपन्या, खासगी विकसक यांच्यामार्फत करण्यात येणारे बांधकाम, दुरुस्ती, विविध प्रकारची खोदाईमुळे मोठ्या प्रमाणात राडारोडा निर्माण होतो. निर्माण होणारा राडारोडा कुठे टाकावा, यासाठी पर्याय नसल्याने नागरिकांकडून तो ओढे, नाले, नदीकिनारी आणि मोकळ्या जागांवर टाकला जातो. या सर्व प्रकारच्या राडारोड्याचे निर्मूलन करण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याचे नियोजन केले आहे.
यात राडारोडा वाहतूक करणे, राडारोड्यावर प्रक्रिया करणे, राडारोडा ठेवण्यासाठी जागा निश्चित करणे, संकलन करण्यात आलेला राडारोडा आवश्यकतेनुसार भूभरावासाठी आणि खाणीचा भाग समतल करण्यासाठी वापरणे आदींचा समावेश आहे. हा प्रकल्प वाघोली येथे उभारण्यात येत आहे. मात्र, त्याचे काम रखडल्याने तो अद्यापही सुरू झालेला नसून आता हा प्रकल्प नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
संकलन केंद्र कागदावरच
हा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सर्व 15 क्षेत्रीय कार्यालयांना आपल्या हद्दीत असलेल्या ऍमेनिटी स्पेसच्या जागेत राडारोडा संकलन केंद्र उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, एकही क्षेत्रीय कार्यालयाकडून गेल्या चार महिन्यांत याबाबत काहीच हालचाल करण्यात आलेली नाही. परिणामी हा प्रकल्प पुढील महिन्यात सुरू झाला तरी अशी संकलन केंद्रच नसल्याने महापालिकेने केलेले नियोजनानुसार, हा प्रकल्प चालणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.