प्राध्यापकांची भरती लांबणीवर

पुणे – देशातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी महाविद्यालये, विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या रिक्‍त जागा भरण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) उच्च शिक्षण संस्थांना 6 महिन्यांची मुदत दिली होती. मात्र, उच्च शिक्षण संस्थांच्या प्रतिसादाअभावी ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडल्याचे चित्र आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आता रिक्‍त जागांची माहिती भरण्यासाठी 10 नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांत देशभरातील प्राध्यापकांच्या जागा रिक्‍त असल्याने त्याचा शैक्षणिक कामकाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गुणवत्ता वाढण्याऐवजी ढासळत असल्याचेही निरीक्षण विविध अहवालांतून मांडण्यात आले. त्यामुळे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने रिक्‍त जागा भरण्याचा निर्णय घेतला. त्यासाठीची प्रक्रिया राबवण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार देशभरातील प्राध्यापकांच्या रिक्‍त जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करून यूजीसीने उच्च शिक्षण संस्थांना वेळापत्रकच तयार करून दिल्याने आश्‍वासक चित्र निर्माण झाले.

रिक्‍त जागांची माहिती ऑनलाइन भरण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर या प्रक्रियेत अनेकदा खंड पडत गेला. त्यामुळे देशभरातील अनेक उच्च शिक्षण संस्थांकडून प्राध्यापकांच्या रिक्‍त जागांचा तपशील ऑनलाइन भरण्यात आला नसल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती विनाखंड भरली जावी यासाठी यूजीसीने उच्च शिक्षण संस्थांना स्मरणपत्रेही पाठवली.

यूजीसीने आता पुन्हा एकदा उच्च शिक्षण संस्थांना रिक्‍त जागांची माहिती भरण्यास सांगत 10 नोव्हेंबरची मुदत दिली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.