संगमनेर – वाकोडी फाटा येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमजवळ दोन अनोळखी इसमांनी त्यांच्याकडील विना नंबर कारमध्ये येऊन गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशिन कट केले. या वेळी मशिनमधील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केल्याच्या तक्रारीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ही घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्ह्याचा तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते. त्यामुळे पोलीस निरीक्षक आहेर यांनी पोलिसांची दोन पथके नेमून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
त्यामुळे या पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्र येथील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशिन कट करून चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींचा राहुरी परिसरात शोध घेताना पथकास एक सिल्व्हर रंगाची स्विफ्ट कार भरधाव जाताना दिसली. पथकाने संशयित कारची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिल्यानंतर त्यांनी पथकाला कारचा पाठलाग करण्यास सांगितले, तर दुसऱ्या पथकास नगर-मनमाड रोडने जाऊन कारचा शोध घेण्यास सांगितले होते.
पथक एमआयडीसी, विळद परिसरात संशयित वाहनाचा शोध घेताना हे वाहन बायपास रोडने जाताना दिसले. पथकाने खातगाव टाकळी गावच्या शिवारात ताब्यातील वाहन स्विफ्ट कारला आडवे लावून थांबबली. कारमधील दोन संशयितांना पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे अजित ठोसर (वय 22, रा. मातकुळी, ता. आष्टी, जि. बीड. हल्ली रा. पंपिंग स्टेशन, साईनगर, ता. संगमनेर) व जमीर पठाण (वय 21, रा. खांडगाव, ता. संगमनेर) असे सांगितले. या वेळी कारची झडती घेतली असता कारमध्ये ऑक्सिजन सिलेंडर, गॅस टाकी, पेंट स्प्रे, गॉगल, स्टील रॉड, निळे व लाल रंगाचा पाइप, रेग्युलेटर, नोझल, ऍडजस्टेबल पक्कड व ओप्पो कंपनीचा मोबाईल मिळून आल्याने त्या बाबत विचारपूस केली. मात्र, सुरुवातीस ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले; पण अधिक सखोल विचारपूस केल्यानंतर त्यांनी त्यांचे साथीदार रवींद्र चव्हाण (वय 32) व शुभम मंजुळे (वय 25, दोन्ही रा. खडकी, ता. कोपरगाव) यांच्यासोबत मिळून चोरी केल्याची माहिती दिली.
ताब्यात घेतलेल्या चारही आरोपींकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी भिंगार, राहुरी, वैजापूर, सातारा (जि. छत्रपती संभाजीनगर) व अंभोरा (जि. बीड) परिसरात चोरी केल्याची कबुली दिली. विविध ठिकाणी यांच्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपी अजित ऊर्फ कमळ्या ठोसर याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी व चोरी असे गंभीर स्वरूपाचे 11 गुन्हे दाखल आहेत. आरोपी रवींद्र चव्हाण याच्यावर अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथे दरोडा, जबरी चोरी व चोरी असे गंभीर स्वरूपाचे 16 गुन्हे दाखल आहेत.
ताब्यात घेतलेल्या चारही आरोपींच्या कब्जातून 18 लाख 16 हजार 500 रुपये किमतीची दोन महिंद्रा ट्रॅक्टर, एक स्विफ्ट कार, एक बुलेट, एक पल्सर मोटरसायकल व चोरीसाठी आवश्यक साधने अशा मुद्देमालासह ताब्यात घेऊन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर केले. पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.