बॅंकॉक – थायलंडचे पंतप्रधान प्रत्युथ चान-ओ-चा यांनी राजकारणातून सन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणूक न लढवण्याचे आणि राजकारणातून निवृत्त होण्याचे त्यांनी ठरवले आहे. त्यांच्या पक्षाच्यावतीने काल ही घोषणा करण्यात आली.
थायलंडमध्ये मे महिन्यात झालेल्या निवडणुकांमध्ये सरकारला असलेला लष्कराचा पाठिंबा बहुतेक जनतेने अमान्य केला होता. आता थायलंडच्या संसदेमध्ये नवीन पंतप्रधान निवडले जाणार आहेत. त्याच्या दोन दिवस आगोदरच प्रत्युथ यांनी राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे.
थायल्ंडमध्ये 2014 मध्ये झालेल्या लष्करी उठावानंतर प्रत्युथ यांनी लष्करी प्रमुख या नात्याने देशाची सूत्रे आपल्या हाती घेतली होती. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांच्या “मुव्ह फॉरवर्ड पार्टी’च्या नेतृत्वाखालील आघाडीने संसदेत बहुमत मिळवल्यापासून ते देशाचे पंतप्रधान झाले होते. मात्र त्यांच्या सरकारला लष्कराचा पाठिंबा कायम राहिला होता. नवीन सरकार स्थापन हीोपर्यंत प्रत्युथ हे पंतप्रधान म्हणून कायम राहणार आहेत.
प्रत्युथ यांच्या कारकिर्दीला एकाधिकारशाहीचा डाग…
लष्करी उठावापासून प्रत्युथ यांचे थायलंडच्या राजकारणावर वर्चस्व कायम राहिले होते. लष्करी पुराणमतवादी सरकार ज्या प्रकारे सरकार चालवत होते, त्यामुळे जनतेमध्ये या सरकारविरोधात असंतोषाची भावना निर्माण झाली होती. लष्करी उठावानंतर अस्तित्वात आलेल्या सरकारमध्ये एकाधिकारशाही आणि वाढत्या असमानतेमुळे लष्करी जनरल असलेल्या प्रत्युथ यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द डागाळली होती.
2020 मध्ये देशभरात या एकाधिकारशाहीच्याविरोधात आणि प्रत्युथ यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी युवकांनी व्यापक आंदोलन केले होते. आश्वासनांची पूर्तता न केली गेल्यामुळे झालेल्या या आंदोलनादरम्यान देशातील लोकशाही पुन्हा प्रस्थापित करण्याची मागणी केली गेली होती.